The storm of work has ended forever. : कामाच्या माणसाचा झंझावाताला कायमचा पूर्णविराम
Baramati : गेल्या साडेचार दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात झंझावात निर्माण केलेले, रोखठोक भूमिकेमुळे अनेकांना चकित करणारे अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिलेले प्रशासनावर मोठी पकड असलेले नेते म्हणून ओळख असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आज अखेर बारामतीच्या भूमीत विसावले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी मंत्राग्नी दिला. यावेळी बारामती सह राज्यभरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. अपघाताची बातमी कळल्यापासून लाखो समर्थकांनी बारामती मध्ये गर्दी केली. काटेवाडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवलेले त्यांचे पार्थिव प्रांगणात आणण्यात आले. तेव्हा समर्थकांनी अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सर्वसामान्यांचे एखादे काम अडले असेल आणि ते होण्यासारखे असेल तर लगेच त्याची दखल घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे, एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर थेट आणि रोखठोक शब्दात समोरच्याला खडसावणारे अशी ओळख असणारे दादा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आवडायचे त्यांचा या स्वभावावर पण अनेक लोक प्रेम करायचे याची प्रचिती आज जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायातून समोर आली. अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दाटून आल्या होत्या. अनेक जन ढसाढसा रडले तर अनेकांचे डोळे पानावलेले होते.
अंत्यसंस्काराच्या वेळी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे अजितदादांचे नातेवाईक राणा जगजितसिंह आदींची उपस्थिती होती. राज्यातील आणि केंद्रातील राजकीय दिग्दजांकडून अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला, यासाठी सर्वपक्षीय नेते बारामती दाखल झाले होते. यात केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ भाजप अध्यक्ष नितीन नबिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामदास आठवले, हसन मुश्रीफ, शाहू महाराज छत्रपती, गिरीश महाजन, रक्षा खडसे, माधुरी मिसाळ यांच्यासह महाराष्ट्र शासनातील जवळपास सर्व मंत्री उद्धव आणि राज ठाकरे आणि विविध पक्षाचे आमदार मंत्री नेते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.








