All-party-meeting-demands-naming-buldhana-medical-college-after-ajit-pawar : अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी जिल्ह्याची एकजूट; भावूक आठवणींनी उपस्थितांना गहिवर
Buldhana महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान अजरामर करण्यासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (Medical College) ‘स्व. अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यात यावे, अशी आर्त मागणी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे केली आहे. रविवारी गारडे हॉल येथे आयोजित श्रद्धांजली सभेत हा ऐतिहासिक ठराव संमत करण्यात आला.
या सभेचे केंद्रबिंदू ठरले ते माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे परखड भाषण. त्यांनी बुलढाणा मेडिकल कॉलेजच्या निर्मितीचा इतिहास मांडताना सांगितले की, या महाविद्यालयासाठी लागणारी शासकीय मंजुरी, सुरुवातीचा निधी आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा होता. “मेडिकल कॉलेजला दादांचे नाव देणे हा केवळ भावनिक विषय नसून, त्यांच्या कतृत्वाला दिलेला हा न्याय्य सन्मान ठरेल,” असे शिंगणे यांनी नमूद केले.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पण सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात?
सभेत उपस्थित नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून केवळ एक व्यक्ती म्हणून दादांना अभिवादन केले. आमदार मनोज कायंदे दादांच्या आठवणी सांगताना व्यासपीठावरच ढसाढसा रडले. “दादा मला लाडका आमदार म्हणायचे,” हा शब्द उच्चारताच त्यांना कंठ फुटला. यावेळी डॉ. शिंगणे आणि जयश्रीताई शेळके यांनी त्यांना सावरले. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी दादांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचा गौरव केला. राजकीय विरोध असला तरी वैयक्तिक स्नेह जपणारा असा नेता होणे शक्य नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या सभेत नरेश शेळके, जालिंदर बुधवत, विजयराज शिंदे, रविकांत तुपकर यांच्यासह भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व गटांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेत मेडिकल कॉलेजच्या नामकरणाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव आता राज्य सरकारकडे अधिकृतपणे पाठवला जाणार आहे. बुलढाण्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा ठरणारे हे महाविद्यालय आता दादांच्या नावाने ओळखले जावे, यासाठी सर्व पक्ष मिळून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.








