नव्या नेतृत्वाचा राजकीय वावर वाढला; माजी आमदारांसह ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती
Washim : जिल्हा भाजपमध्ये नव्या नेतृत्वाचा प्रभाव वाढत असताना जुन्या जाणत्या नेत्यांची सार्वजनिक कार्यक्रमांमधील अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. पक्षातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये नव्या फळीतील नेत्यांचा सक्रिय सहभाग दिसत असला, तरी माजी आमदार विजय जाधव, लखन मलिक आणि पुरुषोत्तम राजगुरू यांच्यासारखे अनुभवी नेते फारसे सक्रियपणे दिसत नसल्याने भाजपमधील नवे-जुने समीकरण बदलत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा भाजपची सूत्रे सध्या विद्यमान आमदार श्याम खोडे, सई डहाके, नगराध्यक्ष अनिल केंदळे यांच्यासह नव्या फळीतील काही नेत्यांच्या भोवती केंद्रित झाल्याचे चित्र आहे. विविध राजकीय कार्यक्रम, दौरे, बैठका आणि संघटनात्मक उपक्रमांमधून या नेतृत्वाचा वाढता वावर प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या राजकारणात नव्या चेहऱ्यांना अधिक संधी मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष; काँग्रेसचे काळी दिवाळी आंदोलन
मात्र, या राजकीय घडामोडींमध्ये पक्षासाठी यापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती तुलनेने कमी दिसत आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वाने जुन्या नेत्यांना बाजूला ठेवले आहे की, जुन्या नेत्यांनीच नव्या नेतृत्वापासून अंतर राखले आहे, असा प्रश्न राजकीय चर्चेतून पुढे येत आहे.
पक्षात नेतृत्वबदल होणे ही संघटनात्मक प्रक्रियेचा भाग असू शकतो. मात्र, अनुभवी नेत्यांचा राजकीय अनुभव आणि नव्या नेतृत्वाची कार्यपद्धती यांचा समन्वय साधणेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. नव्या फळीचा वाढता प्रभाव आणि जुन्या नेत्यांची मर्यादित उपस्थिती यामुळे हा समन्वय नेमका कसा साधला जात आहे, याबाबत कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आहे.
शेतकऱ्यांच्या संकटांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
जिल्हा भाजपमध्ये खरोखरच सत्ताकेंद्र बदलले आहे की केवळ नेतृत्वाचा चेहरामोहरा बदलला आहे, याचे उत्तर आगामी राजकीय घडामोडींमधून स्पष्ट होईल. नव्या नेतृत्वाला बळ देताना जुन्या जाणत्या नेत्यांना विश्वासात घेण्याचे गणित पक्ष कसे जुळवतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








