कधीकाळी गावात प्रवेशासाठी नक्षलवाद्यांची परवानगी घ्यावी लागायची; तेथे मुक्काम, गोंडी भाषेत संवाद आणि ग्रामस्थांसोबत सहभोजन
Gadchiroli : एकेकाळी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे ज्या गावात प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनालाही सुरक्षेचा विचार करावा लागत होता, त्याच गावात यंदा लोकशाहीचा दीप उजळला. धानोरा तालुक्यातील नक्षलप्रभावित परसवाडी येथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. गावकऱ्यांच्या घरी जाऊन भोजन, गोंडी भाषेतून संवाद आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्याच्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील बदलत्या परिस्थितीचे चित्र समोर आले आहे.
परसवाडी आणि परिसरातील गावांमध्ये अनेक वर्षे नक्षलवाद्यांचा प्रभाव राहिला. त्यांच्या आदेशाशिवाय गावातील सार्वजनिक जीवनातील अनेक हालचाली करणेही ग्रामस्थांसाठी कठीण होते. प्रशासनाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही या भागात जाण्यासाठी सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी लागत असे. अशा वातावरणात लोकप्रतिनिधीने गावात जाऊन मुक्काम करणे आणि ग्रामस्थांसोबत सण साजरा करणे, ही विशेष महत्त्वाची बाब मानली जात आहे.
भाजपमध्ये नवे-जुने नेते आमनेसामने? अंतर्गत अंतराच्या चर्चेला उधाण
सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण मोहिमा, जवानांचे समर्पण आणि शासनाच्या नक्षलविरोधी उपाययोजनांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये परिस्थितीत बदल होत असल्याचे चित्र आहे. त्याचे प्रतिबिंब यंदाच्या दिवाळीत परसवाडीत पाहायला मिळाले. भीतीच्या वातावरणातून विश्वास आणि संवादाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाची ही घटना लक्षवेधी ठरली.
आमदार डॉ. नरोटे यांनी ग्रामस्थांना दिवाळी फराळ आणि ब्लँकेटचे वाटप केले. विशेष म्हणजे, त्यांनी गोंडी भाषेतून गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि विकासविषयक अपेक्षा जाणून घेतल्या. गावातील रस्ते, मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या प्रश्नांवरही यावेळी चर्चा झाली. स्थानिक भाषेत संवाद साधल्यामुळे ग्रामस्थांना आपल्या अडचणी मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली.
या भेटीला कौटुंबिक जिव्हाळ्याची जोडही मिळाली. आमदार डॉ. नरोटे यांनी हरीशचंद्र मडावी यांच्या घरी ग्रामस्थांसोबत भोजन केले. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील संवाद अधिक जवळचा करण्याचा हा प्रयत्न ठरला. गावकऱ्यांच्या घरचा पाहुणचार स्वीकारत त्यांनी दिवाळीचा आनंद सामायिक केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष; काँग्रेसचे काळी दिवाळी आंदोलन
एकेकाळी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे चर्चेत असलेल्या परसवाडीत लोकप्रतिनिधींचा मुक्काम, ग्रामस्थांसोबतचे सहभोजन आणि दिवाळीचा उत्सव ही बदलत्या परिस्थितीची नोंद घेणारी घटना ठरली आहे. बंदुकीच्या सावटातून लोकशाहीच्या विश्वासाकडे होणाऱ्या प्रवासाचे प्रतीक म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते.








