Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर काँग्रेसमध्ये उभी फूट! वडेट्टीवार समर्थकांचा स्वतंत्र गट; महापौरपदाचा पेच आता दिल्ली दरबारी

congress-split-in-chandrapur-vadettiwar-vs-dhanorkar-group-registration : १८ नगरसेवकांसह वडेट्टीवारांचे शक्तिप्रदर्शन, तर धानोरकर गटात १३ सदस्य

Chandrapur चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदावरून काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचला असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थक नगरसेवकांनी स्वतंत्र गटाची नोंदणी केली आहे. यामुळे चंद्रपूर काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले असून, वडेट्टीवार गट (१८ नगरसेवक) आणि खासदार प्रतिभा धानोरकर गट (१३ नगरसेवक) असे दोन गट समोरासमोर उभे ठाकले आहेत. हा वाद आता थेट दिल्लीत पोहोचला असून काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी करून महापौरपद धानोरकर गटाला आणि स्थायी समिती सभापतीपद वडेट्टीवार गटाला देण्याचा ‘फॉर्म्युला’ ठरवला होता. दोन्ही नेत्यांनी हा निर्णय मान्य केल्याचे जाहीर केले होते, मात्र त्यानंतर नगरसेवकांच्या पळवापळवीवरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. वडेट्टीवार समर्थकांनी आता विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गटाची नोंदणी करत महापौरपदावर आपला दावा अधिक मजबूत केला आहे. “आमच्याकडे संख्याबळ जास्त असल्याने आमच्या गटालाच अधिकृत मान्यता मिळावी,” अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Mayoral election : छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचा महापौर?

 

विभागीय आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत जहाल शब्दांत टीका केली आहे. “विभागीय आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर झाल्यासारखे वागत आहेत,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी आवश्यक असलेला ‘फॉर्म क्रमांक तीन’ सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली भरू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. जर आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला, तर विभागीय आयुक्तालयात ठाण मांडून बसू, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडे आणखी मोठी जबाबदारी; शासन निर्णय जारी

 

चंद्रपूरच्या या राजकीय नाट्यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की होत असून भाजप या परिस्थितीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. दिल्लीचे हायकमांड कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकते, यावरच चंद्रपूरचा पुढचा महापौर कोण असेल हे ठरणार आहे. मात्र, या गटातटाच्या राजकारणामुळे चंद्रपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, सत्तेचा सोपान सर करण्यापूर्वीच पक्ष दोन शकलांमध्ये विभागला गेला आहे.