NCP leadership crisis : राष्ट्रवादीत खलबतं; सुनेत्रा पवारांकडेच नेतृत्व सोपवण्यासाठी आमदारांची फिल्डिंग?

Dharmaraobaba-atram-supports-sunetra-pawar-over-praful-patel : विलीनीकरणाच्या वादावर पडदा टाकत आत्रामांचा ‘पवार’ ब्रँडवरच विश्वास

Nagpur राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेतृत्वाचा पेच अधिकच वाढला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाणार, यावर खलबतं सुरू असतानाच, आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी ‘सुनेत्रा पवार’ यांच्याच नावाची भलावण केली आहे. आत्राम यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर फुली मारली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत नवे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना अत्यंत स्पष्टपणे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा पुरस्कार केला. “अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा वहिनींकडेच पक्षाची सूत्रे सोपवावीत. त्या सध्या उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत, त्यामुळे अध्यक्षपदही त्यांनाच मिळावे,” असे आत्राम यांनी सुचवले.

Nana Patole : मोदी-अदानी वादावरून काँग्रेस आक्रमक; अमेरिकन व्यापारी करारावरून राजकीय रान पेटले

शरद पवार गटाकडून होणाऱ्या विलीनीकरणाच्या दाव्यांवर आत्रामांनी थेट प्रहार केला. “अजितदादांनी विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा केल्याची आम्हाला कल्पना नाही. उलट शरद पवार गटानेच सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य करून मूळ राष्ट्रवादीत विलीन व्हावे,” असा नवा पेच त्यांनी समोर टाकला आहे.

राष्ट्रवादीचा अध्यक्ष ‘पटेल नव्हे, तर पाटील’ असावा, या राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विधानावर प्रफुल्ल पटेल यांनी ५ फेब्रुवारी रोजी अधिक आक्रमक पवित्रा घेतला. “आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, हे आमचा पक्ष ठरवेल. ज्यांनी स्वतः कधी साधी निवडणूक लढवली नाही, अशा बाहेरील नेत्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत,” अशा शब्दांत पटेलांनी सुनावले. आपण स्वतः अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे पुन्हा एकदा सांगत पटेलांनी चेंडू पक्षाच्या कोअर कमिटीच्या कोर्टात टाकला आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार समर्थक संगीता खांडेकर यांचे नाव ‘चंद्रपूर महापौरपदासाठी’ प्रदेश भाजपकडून निश्चित

दुसरीकडे, विलीनीकरणाच्या चर्चेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. “फडणवीस या चर्चेत कुठेच नव्हते, त्यांना भाष्य करण्याचा अधिकार नाही,” असे पवार यांनी बारामतीत सुनावले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र, “अजितदादा असा कोणताही मोठा निर्णय माझ्याशी चर्चा केल्याशिवाय घेणारे नव्हते,” असे म्हणत विलीनीकरणाचा दावा खोडून काढला होता. थोडक्यात अजितदादांच्या निधनानंतर पक्षाच्या अस्तित्वाचा हा लढा आता ‘पवार कुटुंबातील वारसा’ विरुद्ध ‘प्रशासकीय अनुभव’ अशा वळणावर येऊन ठेपला आहे.