sunetra-pawar-oath-ceremony-controversy-sunil-tatkare-clarification : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर उठलेल्या वादावर सुनील तटकरेंचा खुलासा
Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 31 जानेवारी रोजी झालेल्या या शपथविधीनंतर विविध राजकीय वर्तुळातून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. विशेषतः शपथविधीची घाई का करण्यात आली, शरद पवारांना याची माहिती होती का, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत काही चर्चा झाल्या होत्या का, यावरून मोठ्या प्रमाणात टीका झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना भूमिका मांडली आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, तीन दिवसांचा विधी पूर्ण झाल्यानंतरच शपथविधी झाला आहे आणि तोही तब्बल 72 तासांनंतर. त्यामुळे हा निर्णय तातडीचा होता, असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. विनाकारण आमच्यावर अन्यायकारक आरोप केले जात आहेत, याबाबत खुलासा होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Finance Commission funds stalled : वित्त आयोगाचा निधी रखडला; जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आर्थिक कोंडीत
ते म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा पाळण्यात आला. त्या तीन दिवसांनंतर चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यात आली आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांना पत्र देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे विनंती केल्यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्यात आला, असा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचे तटकरेंनी स्पष्ट केले.
राजकीय प्रवासाबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागले आणि त्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने प्रचंड आत्मविश्वासाने मेहनत घेतली आणि 59 पैकी 41 जागांवर विजय मिळवला. विधिमंडळ पक्षाचे नेते असलेल्या अजित पवार यांच्या निधनानंतर नव्या नेतृत्वाची निवड ही अपरिहार्य प्रक्रिया होती.
तटकरे यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित करत सांगितले की, अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवले असताना विलीनीकरणाची चर्चा कुणी, कशी आणि कशासाठी केली, याचे उत्तर जर महाराष्ट्राच्या जनतेला मिळाले तर नेमकी घाई कुणाची होती, हेही स्पष्ट होईल. व्हिडिओमध्ये दिसलेल्या काही नेत्यांबाबत निवडणूक चिन्हावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले, मात्र विलीनीकरणाचा विषय कुठून आला, याबाबत मी तिथे उपस्थित नव्हतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आणि विलीनीकरण हे दोन स्वतंत्र मुद्दे असल्याचे सांगत तटकरे म्हणाले की, आधी विलीनीकरणाची चर्चा करणे म्हणजे उपमुख्यमंत्रीपदी दुसऱ्या कोणाला बसवायचे होते का, असा प्रश्न उपस्थित होतो. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्रपणे निवडून आलो आहोत आणि शरद पवार यांच्यासोबत याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
Buldhana Zilla Parishad : बुलढाणा जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर; चिखलीतील इच्छुकांचा खर्चावर ‘ब्रेक’
विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, या विषयावर सध्या बोलणे योग्य नाही. ज्या प्रकारे वातावरण तयार करण्यात आले, त्यातून मी आणि प्रफुल पटेल यांच्यावरही टीका झाली. मात्र सुनेत्रा पवार यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत पक्षाला आणि अजित पवार यांनी मांडलेल्या विचारांना पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार होता, या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा पक्षाची पुढील वाटचाल महत्त्वाची आहे.
तटकरे यांनी शेवटी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील राजकीय वाटचाल एनडीए मध्येच राहणार आहे. अजित पवार हयात असताना त्यांनी अनेक वेळा आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. विलीनीकरणाबाबत पसरवली जाणारी संभ्रमाची स्थिती दूर करण्यासाठी हे सर्व मुद्दे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणे आवश्यक होते, असेही त्यांनी नमूद केले.








