
mumbai-pune-expressway-missing-link-project-marathi : मुंबई-पुणे वाहतूक कोंडी, ‘मिसिंग लिंक’ची डेडलाईन हूकल्याने कोंडी
Mumbai: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील सततची वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे प्रवाशांचा संयम सुटत असतानाच सरकारकडून सुरू असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. नुकत्याच घडलेल्या टँकर पलटीच्या घटनेमुळे तब्बल 32 तास एक्स्प्रेसवेवर वाहतूक ठप्प झाली होती. हजारो वाहनचालक आणि प्रवासी या कोंडीत अडकले होते. टँकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली असली, तरी आजही वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे मुंबई-पुणे प्रवास डोकेदुखी ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक कशी हाताळावी, यासाठी तत्काळ आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र हा प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून रखडलेला असून, त्याला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आल्याने त्याच्या पूर्णतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Weather Alert : महाराष्ट्रात तापमानात चढउतार, काही भागात पावसाचा इशारा
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प हा देशातील अत्यंत महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पांतर्गत ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर करून भव्य पूल उभारण्यात येत असून, सध्या 12 मीटरचा स्लॅब जोडण्याचे काम सुरू आहे. हा पूल जमिनीपासून सुमारे 520 फूट उंचीवर असून, देशातील पहिला आणि जागतिक स्तरावर चौथ्या-पाचव्या क्रमांकाचा असा हा प्रकल्प असल्याचे सांगितले जाते. या मिसिंग लिंकच्या माध्यमातून एक्स्प्रेसवेवरील वाहतूक भार मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात रुंद बोगदा. लोणावळा लेकच्या तब्बल हजार फूट खाली हा बोगदा तयार करण्यात येत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या कामासाठी करण्यात आला आहे. या मार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासासाठी लागणारा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी होणार आहे. हा पर्यायी मार्ग तयार झाल्यानंतर अपघात, कोंडी किंवा नैसर्गिक अडथळ्यांमुळे एक्स्प्रेसवे बंद पडला तरी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिसिंग लिंक प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता. मात्र भौगोलिक अडचणी, तांत्रिक आव्हाने आणि इतर कारणांमुळे या प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. या प्रकल्पामुळे एक्स्प्रेसवेचे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशांना चार मार्गिकांसाठी दोन भव्य बोगदे उभारण्यात येत आहेत. यातील पहिला बोगदा सुमारे 8.92 किलोमीटर लांबीचा असून, दुसरा बोगदा 1.75 किलोमीटरचा आहे.
या दोन बोगद्यांना जोडण्यासाठी लोणावळा-खंडाळा परिसरातील टायगर व्हॅलीवर केबल-स्टेड पूल उभारण्यात येत आहे. हा पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर असून, त्याची लांबी सुमारे 640 मीटर आहे. खोपोली येथून सुरू होणारा हा मिसिंग लिंक रस्ता थेट लोणावळा भागात जोडला जाणार आहे.
एकूणच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाढती वाहतूक, अपघातांचे प्रमाण आणि प्रवाशांचा होणारा त्रास पाहता मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे मानले जात आहे. मात्र सतत बदलणाऱ्या डेडलाईनमुळे हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार, याकडे प्रवाशांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








