chandrapur-municipal-corporation-election-2026-congress-defeat-internal-dispute : खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील वादाचा भाजपला फायदा; ‘ईश्वर चिठ्ठी’नेही फिरवली पाठ
Nagpur चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला असून भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. सर्वाधिक नगरसेवक आणि बहुमताच्या आकड्याच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतरही काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला. या पराभवामागे काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि नेत्यांमधील विसंवाद कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
काँग्रेस नेत्यांमध्ये सुरुवातीपासूनच महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू होती आणि हा वाद प्रदेशाध्यक्षांपासून थेट दिल्लीपर्यंत पोहोचला होता. अखेर वरिष्ठ नेत्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौरपद देण्याचा निर्णय घेतला आणि हा फॉर्म्युला दोन्ही नेत्यांना मान्य करावा लागला.
असे असले तरी, बहुमताचा आकडा जमवण्याची जबाबदारी मात्र एकट्या खासदारांवर सोपवण्यात आली होती. महापालिकेच्या निवडणुकीत खासदारांनी ज्या दोन माजी नगरसेवकांचे तिकीट कापले होते, त्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून विजय मिळवला. विशेष म्हणजे, त्यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याने रसद पुरवल्याची चर्चा आहे. या दोन्ही नगरसेवकांनी प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपला मतदान केले. या दोघांना विश्वासात का घेतले नाही आणि ते कोणाच्या संपर्कात होते? याची आता चंद्रपुरात जोरदार चर्चा रंगली आहे. हे दोघे काँग्रेससोबत राहिले असते, तर काँग्रेसचा पराभव झालाच नसता.
Zilla Parishad elections : शेगावमध्ये शिवसेनेचा ‘निर्धार’; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बांधली कंबर!
खासदारांसोबत मतभेद उफाळून आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी “माजी नगरसेवकांची तिकिटे कोणी आणि का कापली?” असा सवाल उपस्थित केला होता. “अपक्ष निवडून आलेले दोन्ही नगरसेवक आमचेच आहेत आणि ते आमच्याच बाजूने मतदान करतील,” असा दावाही त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला होता. मात्र, वडेट्टीवार हे प्रदेशाध्यक्षांच्या फॉर्म्युल्यावर नाराज असल्याचे त्यांच्या देहबोलीवरून स्पष्टपणे जाणवत होते.
भाजपकडे गेलेल्या दोन नगरसेवकांमध्ये नवनिर्वाचित उपमहापौर प्रशांत दानव यांचा समावेश आहे. भाजप आणि उद्धव सेना यांच्यात समझोता झाल्यानंतर दानव यांनी सेनेच्या गटात प्रवेश केला आणि त्यांना उपमहापौरपद देण्यात आले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार आणि दानव यांना प्रत्येकी ३३ मते पडली होती. अखेर ‘ईश्वर चिठ्ठी’द्वारे निकाल लावण्यात आला, परंतु तिथेही काँग्रेस दुर्दैवी ठरली. दुसरे अपक्ष नगरसेवक नंदू नागरकर यांनीही भाजप-उद्धव सेना आघाडीलाच मतदान केले.
या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पराभवाचे खापर उद्धव सेनेवर फोडले आहे. “राज्यात आघाडी असताना ते भाजपसोबत गेले आणि दगाफटका केला; याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील,” असा इशारा त्यांनी दिला. दुसरीकडे, संजय राऊत यांनी “तुम्हाला तुमचेच नगरसेवक आणि नेते सांभाळता आले नाहीत, म्हणूनच हा पराभव झाला,” अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेसवर पलटवार केला आहे.








