sanjay-raut-on-ganesh-naik-eknath-shinde-bjp-shiv-sena-offer-controversy : ठाणे-नवी मुंबईतील भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांवर शरसंधान; ‘भाजपने तुमच्या पायात बेड्या ठोकल्या’
Mumbai: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते गणेश नाईक यांना उद्देशून थेट राजकीय साद घालत राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण केला आहे. “भाजपत राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही. गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही शिवसेनेत यावे आणि या लढाईचे रणशिंग फुंकावे, विजय गणेश नाईकांचाच होईल,” असे आवाहन राऊत यांनी केले. एकनाथ शिंदे गटाला छुपा पाठिंबा हा शेवटी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राऊत म्हणाले की, भाजपमध्ये राहून गणेश नाईक यांना फक्त आमदारकी आणि मंत्रिपद मिळेल; मात्र अन्यायाविरोधात लढण्याचे बळ कधीच मिळणार नाही. “भाजपने तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवले आहे. ही लढाई तुम्ही तिथे राहून लढू शकणार नाही,” असा टोला त्यांनी लगावला. नवी मुंबई आणि ठाण्यातील मोक्याचे भूखंड बिल्डरांना कसे दिले गेले, रस्ते आणि बगीच्यांसाठी राखीव जागांचा कसा वापर बदलण्यात आला, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी कथित भ्रष्टाचारावर भाष्य केले. स्वतः गणेश नाईक यांनीही “हा भ्रष्टाचार सुरू राहिला तर एकनाथ शिंदे यांना एक दिवस तुरुंगात जावे लागू शकते,” असे विधान केल्याचा दावा राऊत यांनी केला.
दरम्यान, भाजप मुद्दाम टिपू सुलतानसारखे विषय पुढे करून जनतेचे लक्ष मूलभूत प्रश्नांवरून विचलित करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. टिपू सुलतान यांना कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपुरुष म्हणून गौरवण्यात आले तेव्हा भाजपने विरोध का केला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या वेळी राष्ट्रपती म्हणून कार्यरत असलेल्या रामनाथ कोविंद यांच्या उल्लेखासह त्यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली. मुंबईत भाजपच्या सत्ताकाळात टिपू सुलतान यांच्या नावाने रस्ते आणि बगीच्यांना मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
Nagpur Crime: खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत राऊत म्हणाले की, शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले, तर टिपू सुलतान यांना राज्य वारसाहक्काने मिळाले होते. भाजपकडे शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि बेरोजगारी यावर बोलण्यास वेळ नसून निवडणुका जवळ आल्या की टिपू सुलतान, औरंगजेब किंवा अफजल खान यांसारखे मुद्दे पुढे करून धार्मिक ध्रुवीकरण केले जाते, असा आरोप त्यांनी केला.
राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, गणेश नाईक यांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
___








