Eknath Shinde Shivsena : ठाण्याच्या राजकारणात भाजपची मोठी गुगली; एमएमआरडीएच्या विळख्यातून शहराला खेचण्याचे टायमिंग साधले

bjp-tmrda-demand-to-checkmate-shinde-in-thane-krishna-patil : स्वतंत्र ‘टीएमआरडीए’साठी कृष्णा पाटलांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र; बालेकिल्ल्यातच शिंदेंच्या प्रभावाला कात्री लावण्याची भाजपची रणनीती?

Thane राज्यात महायुतीची सत्ता असतानाही ठाण्याच्या वर्चस्वावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील सुप्त संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) छायेतून ठाण्याला बाहेर काढून स्वतंत्र ‘ठाणे महानगर विकास प्राधिकरण’ (TMRDA) स्थापन करण्याची मागणी करत भाजपने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शड्डू ठोकला आहे. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी या मागणीसाठी उपमुख्यमंत्र्यांना धाडलेले पत्र म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाच्या ‘एकहाती’ सत्तेला दिलेले आव्हान मानले जात आहे.

ठाणे शहराच्या विकासाची सर्व सूत्रे आजवर एमएमआरडीएच्या माध्यमातून हलवली जातात, ज्यावर एकनाथ शिंदे यांचा मोठा प्रभाव आहे. मात्र, “एमएमआरडीएचे लक्ष फक्त मुंबईवर आहे,” असा नॅरेटिव्ह सेट करून भाजपने ठाणेकरांच्या स्थानिक अस्मितेला हात घातला आहे. स्वतंत्र ‘टीएमआरडीए’च्या माध्यमातून ठाण्याचा विकासनिधी आणि नियोजनाचे अधिकार नव्या यंत्रणेच्या हाती असावेत, ही मागणी शिंदेंच्या ‘ब्रँड ठाणे’ला प्रशासकीय पातळीवर खिंडार पाडणारी ठरू शकते.

Devendra Fadnavis : ‘व्हिजन २०४७’ चा फडणवीसांकडून मास्टरप्लॅन; २० वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलणार

राजकीय वर्तुळात या पत्राचे टायमिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ठाण्यातील मोठे प्रकल्प आणि क्लस्टर डेव्हलपमेंटचे श्रेय सध्या शिंदे गटाकडे जाते. स्वतंत्र प्राधिकरण झाल्यास या कामांमध्ये भाजपचा सहभाग आणि वजन वाढवण्याची ही पद्धतशीर चाल आहे. ठाण्याची वाहतूक कोंडी आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर बोट ठेवून, गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या स्थानिक नेतृत्वाच्या नियोजनावरच भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एमएमआरडीएच्या विळख्यातून बाहेर पडून ठाण्यासाठी स्वतंत्र बजेट आणि अधिकार मिळवणे, म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण करणे होय, ज्यामुळे भाजपला ठाण्यात अधिक स्पेस मिळेल.

Rohit Pawar on Ajit Pawar death : अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात काय घडले?; ‘त्या’ ७५ सह्यांवरून रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

ठाणे हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि येथे भाजपला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागते, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यातच “ठाणेकरांच्या हितासाठी स्वतंत्र TMRDA हवे,” अशी भावनिक साद घालत भाजपने कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली आहे. कृष्णा पाटील यांनी जरी “हा मुद्दा राजकारणाचा नाही,” असा दावा केला असला तरी, उपमुख्यमंत्र्यांकडे हे पत्र जाणे म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीवर दिलेला ‘घरचा आहेर’ असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही मागणी पेच निर्माण करणारी आहे. जर त्यांनी ही मागणी मान्य केली, तर एमएमआरडीएवरील त्यांचे वर्चस्व कमी होऊन त्याचे श्रेय भाजपला जाईल. आणि जर मागणी नाकारली, तर “ठाण्याच्या स्वतंत्र विकासाला विरोध होत आहे,” असा प्रचार करण्याची आयती संधी भाजपला मिळणार आहे.