akola-vba-protest-against-unauthorized-person-working-in-drda-office : वंचित बहुजन युवा आघाडीची तक्रार; जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कारभारावर गंभीर आरोप
Akola गरिबांसाठीच्या घरकुल योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) कार्यालयात अनधिकृत व्यक्ती शासकीय कामकाज हाताळत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. या कथित गैरप्रकाराविरोधात वंचितने बुधवारी थेट डीआरडीए कार्यालयात हल्लाबोल करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. परिस्थिती तणावपूर्ण होताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी वंचितने पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. गरीब व गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने ‘सर्वांसाठी घरे’ हे महत्त्वाचे धोरण राबवले आहे. या योजनेची अंमलबजावणी डीआरडीएमार्फत केली जाते. मात्र, याच कार्यालयात श्रीकांत वाघमारे नावाची व्यक्ती कोणतीही वैध नियुक्ती नसताना शासकीय कामकाज करत असल्याचा आरोप वंचितने केला आहे.
Ravi Rana : शेतकऱ्यांचा असंतोष, आमदार फाईल घेऊन पोहोचले मंत्रालयात
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी डीआरडीए कार्यालयात जाऊन आक्रमक भूमिका घेतली. वाघमारे यांची नियुक्ती १५ एप्रिल २०२१ रोजी सीएससी कंपनीमार्फत झाल्याचे सांगितले जात असले, तरी संबंधित कंपनीचा करार संपुष्टात आला आहे. राज्य सरकारने २२ सप्टेंबर २०२५ रोजी नव्याने करार केल्याचा दावा असला, तरी वाघमारे यांच्याकडे वैध नियुक्तीपत्र किंवा ओळखपत्र नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
तक्रारीनुसार, नियुक्ती व करार नसताना संबंधित व्यक्ती शासकीय बैठकींना उपस्थित राहते, घरकुल योजनांशी संबंधित गोपनीय कागदपत्रे, फायली व संगणक हाताळते, तसेच कार्यालयात नियमित बसून कामकाज करते. ही बाब शासकीय गोपनीयता कायद्याचे उल्लंघन असल्याचा दावा करत, वंचितने संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Shiv Jayanti 2026 : तणावाच्या आठवणी पुसून मुस्लिम समाजातर्फे छत्रपतींना अभिवादन
वंचितच्या आंदोलनानंतर पोलिसांनी डीआरडीए कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नियुक्ती, शासन आदेश, करारनामा आदी दस्तावेज ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, डीआरडीएचे प्रभारी प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी सांगितले की, “संबंधित व्यक्तीच्या नियुक्ती प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली जाईल आणि प्राप्त माहितीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल.”








