Chandrapur Mayor election : चंद्रपूर महापालिका सत्तास्थापना वादावर काँग्रेसमध्ये खळबळ !

congress-chandrapur-mahanagarpalika-vad-vijay-vadettiwar-mafi-delhi-baithak : विजय वडेट्टीवार यांनी वरिष्ठ नेत्यांची मागितली माफी

New Delhi : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादामुळे काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची गंभीर दखल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याची माहिती आहे. या घडामोडीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माफी मागितल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली येथे मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांतील प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील, रणदीप सुरजेवाला, सुखजिंदर सिंह रंधावा, मध्यप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांचीही उपस्थिती होती. बैठकीत प्रामुख्याने भारत-अमेरिका व्यापार करार आणि त्याचा देशातील शेतकरी वर्गावर होणारा संभाव्य परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच पक्षाची आगामी राजकीय रणनीती काय असावी, यावरही विचारमंथन झाले.

Shrikant Shinde : कल्याण-डोंबिवली कात टाकणार! ४,८९७ कोटींच्या निधीतून पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारणार

मात्र या बैठकीच्या सुरुवातीलाच चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेदरम्यान झालेल्या घडामोडींचा मुद्दा उपस्थित झाल्याचे समजते. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षांतर्गत मतभेद उफाळून आल्याने बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आले. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २७ जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेस समर्थित जनविकास आघाडीने ३ जागा जिंकल्या होत्या. तरीही अंतर्गत गटबाजीमुळे सत्ता स्थापनेची संधी हुकल्याचे स्पष्ट झाले.

या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्या गटांतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यातही काँग्रेस अपयशी ठरली. परिणामी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी एकत्र येत चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली.

Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या पीएसोबत ओळख असल्याचे सांगून ७ लाखांचा गंडा; नागपुरातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल

चंद्रपूरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे पक्षश्रेष्ठींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. बैठकीदरम्यान विजय वडेट्टीवार यांनी घडलेल्या घटनांची जबाबदारी स्वीकारत मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांची माफी मागितल्याचे समजते. वरिष्ठ नेतृत्वाने या विषयावर नंतर चर्चा करू असे सांगत तत्काळ प्रतिक्रिया देणे टाळल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, चंद्रपूरमधील राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक शिस्त आणि अंतर्गत समन्वय यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत एकजूट राखणे आणि स्थानिक पातळीवरील मतभेद वेळेत सोडवणे हे काँग्रेस नेतृत्वापुढील मोठे आव्हान ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.