Nitin Raut: ३२ सरकारी नोकऱ्यांसाठी लाखो झाडांची कत्तल करायची का?

Tree-cutting-for-32-government-jobs-issue-in-budget-session : नितीन राऊत यांचा वनविभागाला सवाल, विधानसभेत मांडला मुद्दा

Nagpur ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशाचा अभिमान आहे. महाराष्ट्राचे पर्यटन या प्रकल्पाने वाढले आहे. असे असताना केवळ ३२ कायमस्वरूपी नोकऱ्यांचे गाजर दाखवून लाखो झाडांची कत्तल आणि वन्यजीवांचा अधिवास नष्ट करण्याचा घाट सरकार का घालत आहे, वाघांचा नैसर्गिक भ्रमणमार्ग रोखून सरकारला नक्की कोणाचे खिसे भरायचे आहेत? असा घणाघात माजी मंत्री, आमदार डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत सरकारवर केला.

ताडोबा-अंधारी आणि नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या कॉरिडॉरमधील प्रस्तावित प्रकल्पाचा मुद्दा आक्रमकपणे त्यांनी मांडला.

राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने २४ जानेवारी २०२४ रोजी या प्रकल्पाला स्पष्ट नकार दिला होता. मग अवघ्या वर्षभरात असे कोणते दिवे लागले की, या विनाशकारी प्रकल्पाची शिफारस राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे करण्यात आली. हा निर्णय संशयास्पद आहेत. वनविभागाचे अधिकारी दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार या प्रकल्पातून स्थानिकांना मोठा रोजगार मिळेल, असा दावा करत आहे. मात्र, डॉ. राऊत यांनी सभागृहात वस्तुस्थिती मांडली.

President draupadi murmu in Nagpur: विश्वास ठेवा भारत पुन्हा विश्वगुरू होणारच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ते म्हणाले की, या प्रकल्पातून केवळ ३२ कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार आहेत. या तुटपुंज्या नोकऱ्यांसाठी लाखो झाडांची कत्तल आणि वन्यजीवांची जीवनरेखा असलेला मार्ग नष्ट करणे हा कोणता न्याय आहे. स्थानिक नागरिक आणि वन्यजीव प्रेमींचा विरोध डावलून सरकार कोणाच्या हितासाठी हा अट्टहास करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

BMC budget 2026 : ८०,९५२.५६ कोटींचा मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर

 

आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गणेश नाईक यांनीदेखील त्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. काही मोजक्या नोकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा नाश करणे हे अनुचितच आहे, असे नाईक यांनी मान्य केले. केंद्र समितीकडे शिफारस करताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.