rajya-sabha-election-bjp-25-aspirants-madhav-bhandari-core-committee-meeting-varsha-bungalow : माधव भंडारी पुन्हा चर्चेत; फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर निर्णायक बैठक
Mumbai : आगामी राज्यसभा निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपच्या गोटात उमेदवार निश्चितीची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातील सात राज्यसभा जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काहीच दिवस उरले असल्याने पक्षांतर्गत बैठका आणि रणनीती आखणीला गती मिळाली आहे. सत्ताधारी महायुतीत सर्वाधिक जागा असलेल्या भाजपसमोर चार उमेदवार निश्चित करण्याचे आव्हान आहे, तर इच्छुकांची संख्या तब्बल 25 वर गेल्याने स्पर्धा चुरशीची झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थान वर्षा बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत सुरुवातीला चार ते पाच नावांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असली तरी अंतिम निर्णयासाठी 25 जणांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अंतिम शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्वाकडून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
BMC budget 2026 : ८०,९५२.५६ कोटींचा मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर
दिल्लीला पाठवण्यात येणाऱ्या संभाव्य यादीत विनोद तावडे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, अमर साबळे, प्रीतम मुंडे, डॉ. संगीता फुसाटे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ आणि कट्टर निष्ठावंत नेते माधव भंडारी यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती आहे. प्रत्येक राज्यसभा निवडणुकीवेळी भंडारी यांचे नाव पुढे येते, मात्र अंतिम क्षणी त्यांना संधी मिळत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असते. यंदा मात्र त्यांच्या नावाकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री राहिलेले रामदास आठवले यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीतील समन्वय आणि सामाजिक समीकरण लक्षात घेता त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत उर्वरित तीन जागांसाठी भाजपमधील इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे.
राज्यसभेच्या सात जागांसाठीचे गणित पाहता विद्यमान विधानसभा सदस्यांची संख्या 286 आहे. प्रत्येक आमदाराचे मतमूल्य 100 धरल्यास एकूण मतमूल्य 28,600 इतके होते. त्यानुसार एका उमेदवारासाठी सुमारे 3,576 म्हणजेच 36 आमदारांचा कोटा आवश्यक ठरतो. भाजपकडे 136 आमदार असून तीन जागा सहज मिळवण्यासाठी 108 मतांची आवश्यकता आहे. त्यानंतर भाजपकडे 28 मते अतिरिक्त राहतात. शिवसेनेकडे 56 आमदार असल्याने त्यांना एक जागा निश्चित मिळू शकते आणि 20 मते शिल्लक राहतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदार असून एक जागा मिळवल्यानंतर त्यांच्याकडे 4 मते उरतात.
Nitin Raut: ३२ सरकारी नोकऱ्यांसाठी लाखो झाडांची कत्तल करायची का?
या सर्वांची बेरीज करता महायुतीकडे एकूण 52 अतिरिक्त मते जमा होतात. सहाव्या जागेसाठी 36 मते वापरली तरी 16 मते उरतात. त्यामुळे सातवा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी सुमारे 20 मतांची गरज भासणार आहे. विरोधी बाकांवर उद्धव ठाकरे गटाकडे 20, शरद पवार गटाकडे 10 आणि काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. महाविकास आघाडीने एकत्रित उमेदवार दिल्यास 36 चा कोटा काठावर पूर्ण होऊ शकतो.
एकंदरीत राज्यसभा निवडणूक 2026 ही केवळ संख्याबळाची लढत नसून पक्षनिष्ठा, सामाजिक प्रतिनिधित्व आणि केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास या सर्व घटकांची कसोटी ठरणार आहे. भाजपच्या 25 इच्छुकांमध्ये अंतिम चार जणांची निवड कोणाची होणार, आणि विशेषतः माधव भंडारी यांना यंदा तरी संधी मिळणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत दिल्लीतील निर्णयानंतरच या राजकीय समीकरणाला अंतिम रूप मिळणार आहे.








