government-to-launch-search-operation-for-lawrence-bishnoi-gang-member : ‘लॉरेन्स बिश्नोई’ गँगने दिली होती धमकी, आरोपीचा शोध सुरू
Akola अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना कुख्यात ‘लॉरेन्स बिश्नोई’ गँगकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी विधानसभेत गाजला. “दहा कोटींची व्यवस्था केली नाही, तर तुझी बाबा सिद्दीकीप्रमाणे हत्या करू,” असा थेट इशारा देण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
या धमकीमागे गँगस्टर शुभम लोणकर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाकडे लक्ष वेधताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला. आ. पठाण यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात यावी तसेच धमकी देणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या दिवशी आ. पठाण यांना धमकीचा कॉल आला, त्याच दिवशी मी त्यांच्याशी संपर्क साधला. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आ. साजिद खान पठाण यांना संपूर्ण पोलिस संरक्षण देण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत.”
Walmik karad : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा झटका
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “शुभम लोणकर हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असून तो सध्या फरार आहे. मात्र, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कामाला लागली आहेत. आमदारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आमदारालाच थेट खंडणीची धमकी दिली जाणे अत्यंत चिंताजनक असल्याचे मत विरोधकांनी सभागृहात व्यक्त करत सरकारवर कडक शब्दांत टीका केली.
Devendra fadnavis : अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
आ. पठाण यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी गृह विभागाची असून, “त्यांना काहीही होऊ देणार नाही,” अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. आता आरोपीच्या अटकेकडे आणि वाढीव सुरक्षेच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








