raj-thackeray-on-ajit-pawar-plane-crash-fir-question-government-stand : अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सवाल
Mumbai : अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी गुन्हा नोंदवण्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापले असताना राज ठाकरे यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. आमदार रोहित पवार यांनी शिवतीर्थवर जाऊन त्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत, “एफआयआरला सरकार का घाबरतंय?” असा थेट सवाल उपस्थित केला. केवळ एक एफआयआर नोंदवण्याबाबत टाळाटाळ का केली जाते, यामुळेच जनतेच्या मनात संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.
अजितदादा पवार यांचा विमान अपघात की घातपात, या मुद्द्यावर रोहित पवार यांनी विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र तीन ठिकाणी नकार मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, सरकारच्या इतर सर्व बाबी बाजूला ठेवा, पण एफआयआर नोंदवला जात नसेल तर प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. “अजितदादांसारख्या नेत्याबाबत एफआयआर होत नसेल, तर सामान्य माणसाचं काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सरकारी दबावामुळेच गुन्हा नोंदवला जात नाही का, अशी शंका व्यक्त करत त्यांनी सांगितले की अशा प्रकारच्या भूमिकेमुळे जनतेच्या मनात ‘काही काळंबेरं आहे का’ असा विचार येतो. दुर्दैवी अपघात झाला, तो कुणाच्याही बाबतीत होऊ नये; मात्र अशावेळी पारदर्शकतेसाठी एफआयआर होणं गरजेचं आहे. जर अधिकार्यांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवू दिला जात नसेल, तर त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
या संदर्भात राज ठाकरे यांनी केवळ सरकारलाच लक्ष्य केले नाही, तर सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणावर भूमिका मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. “मुख्यमंत्री बोललेच पाहिजेत; पण सुनेत्रा वहिनींनीही स्पष्टपणे बोललं पाहिजे,” असे ते म्हणाले. यंत्रणांवर दबाव आहे का, याबाबत जनतेसमोर स्पष्टता यायला हवी, असे त्यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : वनसंपदेपासून ज्ञानसंपदेपर्यंत… मुनगंटीवारांचा सभागृहात अफलातून युक्तिवाद
सीबीआय चौकशी सुरू राहील, तपास आपलं काम करेल; मात्र एक साधा एफआयआर नोंदवण्याबाबत अडथळे का येतात, हा मूलभूत प्रश्न असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रोहित पवार यांनी मांडलेले सर्व मुद्दे आपण ऐकले असून, या प्रकरणात पारदर्शकता आणि न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली. राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली असून, सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
__








