War of words between Harshjit Deshmukh and Yashomati Thakur; internal rift surfaces within Congress : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्येच आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा
Amravati विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि पक्षाचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून, या वादामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दोन दिवसांपूर्वी यशोमती ठाकूर यांनी हर्षजीत देशमुख यांच्यावर निवडणुकीत १५ ते २० कोटी रुपये घेऊन ‘मॅनेज’ झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांनंतर देशमुख यांनीही माध्यमांशी संवाद साधत ठाकूर यांच्यावर पलटवार केला.
देशमुख म्हणाले की, त्यांच्या बदनामीचा प्रयत्न करून अप्रत्यक्षपणे विरोधकांना फायदा करून देणे आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, हा यशोमती ठाकूर यांचा उद्देश असल्याचे दिसून येत आहे. आपण आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगत, कोणतीही माहिती न घेता किंवा विचारपूस न करता ठाकूर यांनी पक्षाचीच बदनामी सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला.
Chainsukh Sancheti : आमदारांची शेरोशायरी… लोक म्हणाले पहिले मतदारसंघातील समस्या बघा!
देशमुख यांच्या या प्रतिक्रियेनंतर यशोमती ठाकूर यांनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधला. “हा प्रकार ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असा आहे. जर त्यांना खरोखर निवडणूक लढवायची असेल, तर त्यांनी रुग्णालयातून बाहेर पडून प्रचारात उतरावे. निवडणुकीसाठी अवघे चार ते पाच दिवस शिल्लक असताना उमेदवाराने सज्ज असणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
sarpanches-turned-contractors : कंत्राटदार झालो, अन् अडचणीत आलो!; बिलांसाठी सरपंचांची पंचायत धावपळ
देशमुख यांच्या प्रतिक्रिया चीड निर्माण करणाऱ्या असून, त्यातून भाजपलाच फायदा होत असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील हा अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आल्याने पक्षातील मतभेद पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत. अमरावतीच्या राजकीय वर्तुळात या शाब्दिक युद्धाची जोरदार चर्चा रंगली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससमोरील आव्हाने अधिक ठळकपणे समोर आली आहेत.








