use-of-plastic-bags-nagpur-municipal-officials-fail-to-take-action : आमदाराचा विधानसभेत सवाल; ना कायद्याची अंमलबजावणी, ना दंड आकारणी
Nagpur राज्यात प्लास्टिक बंदीचा कायदा करण्यात आला आहे तर मात्र दारोदारी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कसा काय होतो? कायदा केला तर त्याला कोणी जुमानत का नाही? महापालिकेचे अधिकारी त्याची अंमलबाजवणी करीत नाही असे सांगून भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी आपल्याच सरकारला विधानसभेत धारेवर धरले.
अधिवेशनात प्लास्टिक बंदीच्या लक्षवेधीवर त्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पर्यावरण राखण्यासाठी अनेक चांगले कायदे करण्यात आले असले तरी कृत्रिम फुले आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराला कुठलाच अटकाव नाही. नागपूर शहरात प्रत्येक दुकानात प्लास्टिकच्या पिशव्यांमधून सामान दिले जाते. भाजी विक्रेते व फुल विक्रेतेसुद्धा प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करतात. यांचा पर्यावरणावर तसेच आयोगावर होणारा परिणाम लक्षात आणून देत प्रवीण दटके यांनी प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
कृत्रिम फुले प्लॅस्टिकपासून बनवल्या जातात. जे नॉन-बायोडिग्रेडेबल (न विघटणारे) असते. भारतात याचा वापर खूप वाढला आहे, विशेषतः सण-उत्सव, लग्न, पूजा आदी कार्यक्रमात त्याचा वापर होत आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे शहरांचेही मोठे नुकसान होत असून नागपुरात प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात अडकून ड्रेनेज सिस्टीम ब्लॉक झाल्याचेही प्रकार झाले असल्याचे दटके म्हणाले.
दटके यांचा रोष नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे होता. कायदा असताना महापालिकेचे अधिकारी कुठलीची कारवाई करीत नाही. दंड आकारला जात नाही त्यामुळे उघडपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत आहे याकडे त्यांनी विधानसभेचे लक्ष वेधले. यावेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर देताना नॉन बायोडिग्रेडेबल फुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक नियम करणार असून त्यासंबंधी सजावट करणारे आणि मॅरेज हॉल यांना सूचना देण्यात येतील असे आश्वासन दिले.








