Rajya sabha election : राज्यसभा रणधुमाळीत शरद पवारांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंचा डबल डाव?

rajya-sabha-election-2026-eknath-shinde-mega-plan-against-sharad-pawar : दोन उमेदवारांच्या चर्चेमुळे राजकारण तापले

Mumbai : राज्यसभा निवडणूक 2026 पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. शरद पवारांविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यसभेच्या एका उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची 37 मते आवश्यक आहेत. महायुतीकडे एकूण 232 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. त्यात शिंदे गटाकडे 20 अतिरिक्त मते तर अजित पवार गटाकडे 3 अतिरिक्त मते असल्याने सहाव्या आणि सातव्या जागेवर निर्णायक लढत होऊ शकते. शिंदे गट खरोखरच दोन उमेदवार जाहीर करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Farmer loan waiver : मोठी घोषणा लवकरच? ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीवर निर्णय

शिवसेना शिंदे गटातून राज्यसभेसाठी इच्छुकांची मोठी यादी समोर आली आहे. राहुल शेवाळे, शायना एनसी, ज्योती वाघमारे, संजय निरुपम, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, हेमंत गोडसे आणि संजय मंडलिक ही नावे चर्चेत आहेत. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, भाजपने आपले चार उमेदवार आधीच जाहीर केले आहेत. रामदास आठवले, विनोद तायडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येणे निश्चित मानले जात आहे.

महाराष्ट्रातून सध्या राज्यसभेत असलेले सदस्य म्हणजे शरद पवार (शरद पवार गट), रामदास आठवले (रिपाई), फौजिया खान (शरद पवार गट), रजनी पाटील (काँग्रेस), प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे गट), धैर्यशील पाटील (भाजप) आणि भागवत कराड (भाजप) आहेत.

निवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. 5 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून 6 मार्च रोजी छाननी होणार आहे. 9 मार्चपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 मतदान होऊन सायं. 5 नंतर मतमोजणी होईल.

एकूण 7 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विद्यमान विधानसभा सदस्यसंख्या 286 असून कोट्यानुसार एका उमेदवाराला सुमारे 36 आमदारांची मते आवश्यक आहेत. भाजपकडे 136 आमदार आहेत. तीन जागांसाठी 108 मते लागतात आणि त्यांच्याकडे 28 अतिरिक्त मते शिल्लक राहतात. शिवसेनेकडे 56 आमदार असून एका जागेनंतर 20 अतिरिक्त मते उरतात. राष्ट्रवादीकडे 40 आमदार असून एका जागेनंतर 4 मते अतिरिक्त राहतात. त्यामुळे महायुतीकडे एकूण 52 अतिरिक्त मते उपलब्ध असल्याचा अंदाज आहे.

Rajya sabha elections : मायाताई राज्यसभेवर, अग्निशमन समितीच्या सभापती आता कोण होणार?

महाविकास आघाडीची बाजूही तितकीच रोचक आहे. उबाठाकडे 20, शरद पवार गटाकडे 10 आणि काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. एकत्रितपणे ते एक उमेदवार निवडून आणू शकतात, मात्र त्यासाठी सर्व पक्षांची एकजूट आवश्यक राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर शिंदे गट दोन उमेदवार देऊन सातव्या जागेसाठी आक्रमक खेळी करतो का, आणि शरद पवार यांची रणनीती काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यसभा 2026 ची ही लढत केवळ संख्याबळाची नाही, तर प्रतिष्ठेची बनण्याची चिन्हे दिसत आहेत.