BMC : काँग्रेसमुळे ठाकरे गटाला धक्का; श्रद्धा जाधव यांचा एका मताने पराभव

Shraddha-Jadhav-defeated-in-the-ward-committee-election-of-the-BMC : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत नाट्यमय घडामोड

Mumbai मुंबई महापालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी राजकीय नाट्यमय घडामोड घडली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला अपेक्षित विजय मिळण्याऐवजी धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांचा केवळ एका मताने पराभव झाला असून या पराभवासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांची अनुपस्थिती कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांपैकी काही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात चुरस पाहायला मिळाली. काही ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर काही समित्यांमध्ये मतांच्या जोरावर निर्णय झाला.

एफ उत्तर आणि एफ दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक सर्वाधिक चुरशीची ठरली. येथे संख्याबळाच्या आधारावर ठाकरे गटाची बाजू मजबूत असल्याचे मानले जात होते. त्यामुळे श्रद्धा जाधव यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र मतदानाच्या वेळी अनपेक्षित घडामोड झाली. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या काही नगरसेवकांनी मतदानाला हजेरी लावली नाही.

Nagpur Municipal Corporation : शहर बस सुसाट धावणार, मेट्रोपोलिटन परिवहन कंपनी स्थापना होणार

यामुळे मतदानाचे गणित बदलले आणि शिवसेना (शिंदे गट) उमेदवार मानसी सातमकर यांना अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाली. सातमकर यांना भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची मते मिळाली आणि एकूण आठ मते त्यांच्या बाजूने पडली. दुसरीकडे श्रद्धा जाधव यांना ठाकरे गटाची सहा आणि मनसेचे एक असे एकूण सात मते मिळाली. परिणामी त्या केवळ एका मताने पराभूत झाल्या.

या निकालानंतर महाविकास आघाडीत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी व्हिप जारी केला होता, तरी काही नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने ठाकरे गटाला मोठा राजकीय फटका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आघाडीतील समन्वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, इतर काही प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. काही समित्यांमध्ये काँग्रेसनेही विजय मिळवला. त्यामुळे या निवडणुकांमधून मुंबई महापालिकेतील सत्तेची नवी समीकरणे समोर येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Sukhoi Su 30 crash in assam : सुखोई विमान कोसळले, नागपूरच्या वैमानिकाने गमावले प्राण

‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक ज्ञानराज निकम यांची निवड झाली. ‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आकाश पुरोहित यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची व आर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या लीना देहरकर यांची बिनविरोध निवड झाली. आर मध्‍य आणि आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने एकही उमेदवार न दिल्याने सत्ताधारी भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. पी पूर्व आणि पी पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हैदरअली अस्लम शेख हे १० मते मिळवून निवडून आले.

प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणात नवे राजकीय संकेत मिळाले आहेत. काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे ठाकरे गटाचा पराभव झाल्याची चर्चा सुरू असताना, आगामी काळात महाविकास आघाडीत या मुद्द्यावरून राजकीय तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.