vishwas-patil-admits-fictional-characters-sambhaji-novel-koregaon-bhima-commission : कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
Pune: छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नसल्याची कबुली प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर दिली आहे. तसेच त्यांच्या ‘संभाजी’ या कादंबरीतील काही पात्रे पूर्णपणे काल्पनिक असल्याचेही त्यांनी उलटतपासणीत मान्य केले.
भीमा कोरेगाव हिंसाचार २०१८ प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर शुक्रवारी दिवसभर सुनावणी झाली. या वेळी राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विश्वास पाटील यांची सविस्तर उलटतपासणी घेतली. विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पाटील यांनी त्यांच्या कादंबरीतील काही उल्लेख काल्पनिक असल्याचे स्पष्ट केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘संभाजी’ या कादंबरीतील अंत्यसंस्कारावरील कथनावरून यापूर्वी महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता. काही गटांनी महाराजांचा अंत्यविधी विशिष्ट व्यक्तीने केला, अशी भूमिका मांडत दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ज्याची चौकशी सध्या सुरू आहे.
उलटतपासणीदरम्यान ॲड. शिशिर हिरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विश्वास पाटील यांनी सांगितले की, संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख सापडत नाही. तसेच कादंबरीतील जना परीटिण, गोविंद नाक, दामाजी पाटील आणि पाटलीण ही पात्रे पूर्णपणे काल्पनिक असल्याचे त्यांनी मान्य केले.
विश्वास पाटील यांनी पुढे सांगितले की, ‘संभाजी’ ही कादंबरी काही ऐतिहासिक तथ्ये आणि भूभाग यावर आधारित असली तरी त्यामध्ये कल्पनाविलासही आहे. कादंबरीतील लिखाणाचा गैरवापर करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो निषेधार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Old vehicles tax : जुनी वाहने मोडीत काढून नवी घेतल्यास करसवलत
दरम्यान, सुनावणीदरम्यान जेधे शकवली, मासीरे आलमगिर, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना आणि खाफी खान यांसारख्या तत्कालीन इतिहासकारांच्या नोंदींचा उल्लेख करत ‘संभाजी’ कादंबरीतील काही कथनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असल्याची माहिती अॅड. शिशिर हिरे यांनी दिली.








