uddhav-thackeray-shivsena-demands-to-open-purchase-centre : खरेदी केंद्रे सुरू ठेवण्याची उद्धवसेनेची मागणी
Buldhana खरीप हंगामातील मका, सोयाबीन आणि कापूस खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत नाफेड आणि सीसीआयची खरेदी केंद्रे बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात शेतमाल घरात पडून आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत खरेदी केंद्रे तातडीने सुरू ठेवावीत, अशी मागणी उद्धवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २०२५-२६ च्या खरीप हंगामात बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ५२ हजार ८५५ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड झाली आहे. नाफेडच्या निकषानुसार हेक्टरी ३९ क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यात सुमारे २० लाख क्विंटलपेक्षा अधिक मका उत्पादन अपेक्षित आहे. मात्र यासाठी केवळ ६० हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
Farmers loan waiver : कर्जमाफीचे स्वागत; मात्र नियमित कर्जदारांना किमान दीड लाख द्या
सुमारे ५ हजार ७०० शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही अनेक खरेदी केंद्रांवर उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत मका खरेदी थांबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे बाजारभाव घसरत असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे उद्धवसेनेचे म्हणणे आहे.
याशिवाय सोयाबीनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे पडून असून त्याची खरेदीही प्रभावीपणे होत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. कापसाच्या बाबतीतही खुल्या बाजारातील दर अनिश्चित असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रांना प्राधान्य दिले; मात्र ती केंद्रेही बंद होत असल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या घरातील शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत सर्व खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही उद्धवसेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.








