Sandip Shelke : जिल्हा समन्वयकपदाचा राजीनामा, आता जिल्हाध्यक्ष होणार?

sandip-shelke-may-get-congress-district-president-post : संदीप शेळकेंकडे जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व येण्याची शक्यता

Buldhana बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर शेळके यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

संदीप शेळके यांनी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची वाट मोकळी केली. जिल्हाध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेला त्यांनीही दुजोरा दिल्याने या घडामोडींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसमधील कार्यकर्ते व पदाधिकारी इतर पक्षांत प्रवेश करत असल्याने पक्षात काहीशी मरगळ आल्याची चर्चा आहे.

Sunetra Pawar : देऊळगाव राजाला १८ कोटींचा निधी द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन

या पार्श्वभूमीवर दमदार आणि सक्रिय नेतृत्व जिल्हाध्यक्षपदी आणण्याची मागणी पक्षांतर्गत स्तरावरून होत होती. त्यानुसार प्रदेश पातळीवरून जिल्हाध्यक्षपदात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेतेही जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात होते. अॅड. विजय सावळे, प्रकाश पाटील आणि दत्ता काकस हे नेते या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र संदीप शेळके यांच्या संभाव्य नियुक्तीमुळे त्यांच्या आशांवर पाणी फिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Harshwardhan Sapkal : गृहजिल्ह्यात काँग्रेसची गळती थांबे ना, सपकाळांचे टेंशन वाढले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात नव्या ऊर्जेची गरज असल्याने युवा चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती आखली जात असल्याचेही बोलले जात आहे.दरम्यान, शेळके यांनी ठाकरे सेनेतून बाहेर पडण्यामागे नेमके कारण काय, याबाबतही विविध चर्चा रंगल्या असून आगामी काळात या राजकीय घडामोडींना कोणते वळण मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.