new-comers-getting-key-posts-while-loyalists-given-secondary-status-in-congress : पक्षासाठी आयुष्य वेचणाऱ्यांचे काय?, काँग्रेस कार्यकर्त्यांचा सवाल
Jalgao Jamod जळगाव जामोद येथे नुकत्याच झालेल्या एका राजकीय कार्यक्रमानंतर काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रंगलेल्या चर्चांनी पक्षातील अंतर्गत वास्तव पुढे आले. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान मिळत असल्याची खंत व्यक्त होत असून, इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना मात्र काँग्रेसमध्ये सहजपणे महत्त्वाच्या पदांवर संधी दिली जात असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
कार्यकर्त्यांच्या गप्पांमध्ये हा मुद्दा चांगलाच रंगला. काहींचे मत असे होते की, काँग्रेसच्या बळकटीसाठी दीर्घकाळ झटणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. उलट, अनेक नेते काँग्रेसमध्ये मोठे होऊन नंतर विविध कारणांनी इतर पक्षांत गेले आणि राजकीय समीकरणे बदलताच पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. मात्र अशा नेत्यांना पक्षात परतल्यानंतर लगेचच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
Rahul Bondre : ‘टँलेंट’ शोधण्याची जबाबदारी राहुल बोंद्रेंवर!
यामुळे तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही बोलले जात आहे. “पक्षासाठी आयुष्य वेचणाऱ्यांचे काय?” असा सवाल काही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. या चर्चेदरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांचे उदाहरणही समोर आले. वासनिक यांच्या काळापासून पक्षाशी निष्ठा ठेवून सातत्याने काम करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. तरीही अशा नेत्यांना अपेक्षित संधी मिळत नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Budget 2026 : अर्थसंकल्पाची ‘बॅग’ डॉ. संजय कुटेंच्या हातात; विधिमंडळात रंगला रंजक प्रसंग
काँग्रेसमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या नेत्यांना प्राधान्य देण्याची परंपरा वाढत चालली आहे का, असा प्रश्नही या चर्चेतून उपस्थित झाला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निष्ठावंतांना योग्य संधी देणे गरजेचे असल्याचे मत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. अन्यथा तळागाळातील असंतोष वाढण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचीही चर्चा रंगत आहे.








