maharashtra-e-rickshaw-e-bike-permit-mandatory-transport-minister-pratap-sarnaik :प्रवासी वाहतुकीसाठी नोंदणी बंधनकारक करण्याची परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा
Mumbai : राज्यात प्रवासी वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणि एकसमान नियम लागू करण्याच्या दृष्टीने ई-रिक्षा आणि ई-बाईकसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईक वाहनांना यापुढे मोटार वाहन विभागाकडे रितसर नोंदणी करून अधिकृत परवाना घेणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः शहरांमध्ये ई-रिक्षा आणि ई-बाईकचा प्रवासी वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परवाना घेण्याची सक्ती नव्हती. मात्र वाढत्या ई-वाहनांच्या पार्श्वभूमीवर आणि केंद्र शासनाच्या नियमांनुसार प्रवासी वाहतुकीसाठी एकसमान धोरण लागू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
Vipin Itankar : कोण म्हणतं सिलिंडरची टंचाई आहे, एकही हॉटेल बंद पडले नाही
नवीन नियमांनुसार प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईक वाहनांना मोटार वाहन विभागाकडे अधिकृत नोंदणी करून परवाना घेणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इलेक्ट्रिक रिक्षा या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी समान नियम लागू राहतील. तसेच प्रवासी वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे, नियमबाह्य वाहतूक रोखणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र ई-रिक्षा आणि ई-बाईक संदर्भातील नियम अधिक स्पष्ट करण्यासाठी आणि परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन विभागाकडून विशेष योजना राबविण्याची तयारी सुरू आहे.
परवाना प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी परिवहन विभाग “एक खिडकी योजना” सुरू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि मंजुरी प्रक्रिया एकाच ठिकाणी सुलभ पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये धावपळ करावी लागणार नाही.
Maoist arrested : दोन दशकांपासून यंत्रणेला चकवा देणारा नक्षलवादी कमांडर मृत्युंजय अखेर जेरबंद
कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता टाळण्यासाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी परमिट घेणे अनिवार्य राहणार असल्याचेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. नवीन नियम लागू झाल्यानंतर राज्यातील इलेक्ट्रिक रिक्षा आणि ई-बाईक चालकांना देखील परवान्यासाठी अर्ज करावा लागणार असून यामुळे प्रवासी वाहतुकीचे नियमन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.








