Crime news : “मी सीबीआय अधिकारी बोलतोय, तुम्हाला अटक होणार”

mumbai-crime-news-retired-rbi-employee-cheated-online-by-fake-cbi-officer-andheri : निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, सायबर गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार

Mumbai : अंधेरी पूर्व परिसरात स्वतःला केंद्रीय अन्वेषण विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत एका निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अटक होण्याची भीती दाखवत आरोपीने ऑनलाईन व्यवहारांद्वारे तब्बल १ लाख १० हजार रुपये उकळल्याचे उघड झाले असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला केंद्रीय अन्वेषण विभागातील अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराविरोधात गंभीर गुन्हा दाखल असल्याचे सांगत त्यांना अटक होऊ शकते, अशी धमकी देण्यात आली. या फोनमुळे तक्रारदार घाबरले आणि आरोपीने त्यांचा विश्वास संपादन करत पैसे पाठवण्याचा दबाव टाकला.

LPG crisis : अजून किती अच्छे दिन दाखवणार? विरोधकांचा सवाल

भीतीपोटी तक्रारदारांनी सुरुवातीला गुगल पेच्या माध्यमातून २० हजार रुपये पाठवले. त्यानंतर ४ मार्च रोजी आरोपीने पुन्हा वारंवार फोन करून आणखी पैसे मागितले. १ मार्च ते ४ मार्च या कालावधीत आरोपीच्या सांगण्यावरून तक्रारदारांनी सहा वेगवेगळ्या ऑनलाईन व्यवहारांद्वारे एकूण १ लाख १० हजार रुपये पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र एवढ्यावरही आरोपी थांबला नाही. त्याने पुढे आणखी १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी पैसे उपलब्ध नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीचे फोन उचलणे बंद केले. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार त्यांनी आपल्या मुलाला सांगितल्यानंतर ही सायबर फसवणूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली.

Maha DBT : महाडीबीटीचा फुगा फुटला! पूर्वसंमती बंद, शेतकऱ्यांची थट्टा

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या धमकीच्या फोन कॉल्सना घाबरून कोणालाही पैसे पाठवू नयेत तसेच संशयास्पद फोन आल्यास त्वरित पोलिसांशी किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.