Eknath shinde : एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड

fake-ration-card-with-the-name-of-dcm-eknath-shinde : कार्डवरील माहिती आणि स्वरूप मूळ रेशनकार्डसारखेच

Mumbai राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. बनावट रेशनकार्डमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे नमूद करण्यात आली होती. कार्डवरील माहिती आणि स्वरूप पाहता ते मूळ रेशनकार्डसारखेच दिसत असल्यामुळे सुरुवातीला अनेकांना ते खरे असल्याचा भास झाला.

प्राथमिक तपासात हे रेशनकार्ड पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कार्डावर सरकारी शिक्के आणि स्वाक्षऱ्यांची नक्कल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न झाला असावा, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

LPG crisis : सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे बनावट रेशनकार्डात शिंदे कुटुंबीयांची संपूर्ण माहिती नमूद करण्यात आली होती. यात पत्नी लता शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे तसेच इतर कुटुंबीयांची नावेही लिहिलेली होती. त्यामुळे हे कागदपत्र तयार करणाऱ्यांना कुटुंबीयांची माहिती कशी मिळाली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, बनावट रेशनकार्डाच्या आधारे सरकारी योजनांचा गैरवापर करण्याचा मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील काही प्रमुख नेत्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष गेले आणि तपास सुरू करण्यात आला.

Ashok Dhawad : ३६ वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’; त्या माजी आमदाराच्या वाट्याला प्रतिक्षाच!

या घटनेनंतर जिल्हा पुरवठा विभागाने सिटी चौक पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा शोध घेतला जात आहे. तसेच अशा प्रकारचे बनावट रेशनकार्ड राज्यात आणखी कुठे तयार झाले आहेत का, याचीही चौकशी सुरू आहे.