Shivsena UBT : सहा महिन्यांत ४६ कोटींच्या रस्त्यांची दुर्दशा; कार्यकारी अभियंत्याचा सत्कार

shivsena-ubt-felicitate-executive-engineer-for-bad-roads-gandhigiri : शिवसेना ठाकरे गटाची गांधीगिरी, भ्रष्टाचाराच्या विरोधात अनोखे आंदोलन

Akola प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल ४६.४० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची अवस्था अवघ्या सहा महिन्यांतच दयनीय झाल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या भेगा, उभे तडे आणि उखडलेले काँक्रीट दिसून येत असल्याने या कामातील दर्जाहीनता व संभाव्य भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने सोमवारी गांधीगिरी आंदोलन करत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता निलेश वानखडे यांचा शाल व श्रीफळ देऊन उपरोधिक ‘सत्कार’ करण्यात आला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका करण्यात आली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन रस्त्यांची कामे सुमारे सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाली होती. मात्र, सध्या या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून काँक्रीट उखडलेले दिसत आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी हे रस्ते धोकादायक ठरत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच कोणताही अतिरिक्त निधी न देता त्याच्याकडूनच गुणवत्तापूर्ण पद्धतीने रस्ते नव्याने करून घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.

Girish Gandhi : गांधींसाठी भाजपने संघविरोधी उमेदवारांना दिले बळ!

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बाभुळगाव ते गुडधी-अलियाबाद-घुसर हा १०.७५ कि.मी. लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता सुमारे २१ कोटी रुपयांत बांधण्यात आला. तसेच उगवा ते घुसर हा ६ कि.मी. लांबीचा रस्ता १२ कोटी रुपयांच्या खर्चातून, तर घुसर ते दोनवाडा हा ७.१० कि.मी. लांबीचा रस्ता १३.६७ कोटी रुपयांत उभारण्यात आला. अवघ्या सहा महिन्यांतच या तिन्ही रस्त्यांची गुणवत्ता प्रश्नचिन्हाखाली आल्याचे समोर आले आहे.

Girish Gandhi : गिरीश गांधींचे अभिनंदन करणाऱ्या पोस्टरवर भाजपचे ‘कमळ’ !

घुसर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतची तक्रार उपजिल्हाप्रमुख विकास पागृत यांनी संबंधित विभागाकडे केली होती. मात्र, विभागाने कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई न करता कंत्राटदाराच्या माध्यमातून अकोट फाइल पोलीस ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. सध्या रस्त्यांच्या कामातील कथित भ्रष्टाचार उघड झाल्याने ही तक्रार पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठीच केल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.