Mlc-sandip-joshi-took-u-turn-from-statement-want-to-return-in-politics : फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याचा दावा, मुख्यमंत्र्यांची अद्याप प्रतिक्रिया नाहीच
Nagpur महिनाभरापूर्वी ‘मला थांबायचं आहे’ अशा आशयाचे भावनिक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहून सोशल मीडियावरून राजकीय संन्यासाची खळबळजनक घोषणा करणारे माजी महापौर तथा विद्यमान आमदार संदीप जोशी यांनी आता आपल्या भूमिकेतून ‘यू-टर्न’ घेतला आहे. आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर वैद्यकीय विश्रांतीसाठी केवळ सहा महिने राजकारणापासून दूर राहणार असून, त्यानंतर ‘फिनिक्स’ पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेणार असल्याचे सांगत जोशी यांनी सक्रिय राजकारणात परतण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून संदीप जोशी यांची ओळख आहे. नागपूर महापालिकेचे महापौर आणि सलग दोन वेळा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.
DPC NAGPUR : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या डीपीसीला अच्छे दिन, १६७ कोटींची पडली भर
फडणवीस यांनीच त्यांची वर्णी औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आणि त्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर केली होती. त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ येत्या १३ मे रोजी संपत आहे. भाजप-शिवसेना युतीच्या पहिल्या कार्यकाळात दक्षिण-पश्चिम नागपूर या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाचे पालकत्व आणि पश्चिम नागपूरचे प्रभारी म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. विधानसभेसाठी पश्चिम नागपूरमधून त्यांनी उमेदवारीची मागणीही केली होती.
Katol blast : राऊळगाव कंपनीतील स्फोटाची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
मात्र, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीच्या काळात संदीप जोशी अचानक पडद्याआड गेले होते. निवडणुकीचे निकाल लागताच त्यांनी समाजमाध्यमावरून ‘मला थांबायचे आहे’ असे जाहीर करून राजकीय निवृत्तीचा पवित्रा घेतला होता. या निर्णयामुळे भाजपसह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आपल्या समर्थकांना महापालिकेत उमेदवारी नाकारल्यामुळे जोशी नाराज असल्याची चर्चा होती, तर दुसरीकडे विधान परिषदेत पुन्हा संधी मिळावी, यासाठी हा केवळ एक ‘स्टंट’ असल्याचे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणत होते.
Nagpur municipal corporation : चालते व्हा…भाजपचा पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीला अल्टिमेटम
विशेष म्हणजे, या संपूर्ण नाट्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट, हा विषय पुन्हा काढू नये, अशी तंबी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खासगीत दिल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर आता संदीप जोशी यांनी नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. मी केवळ सहा महिने विश्रांती घेणार असून त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने राजकारणात सक्रिय होईन, असा दावा जोशी यांनी केल्याने आता त्यांच्या या ‘फिनिक्स’ भरारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








