Discontent in Khamgaon against the increase in property tax : करवाढीच्या विरोधात संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळाचा धडक मोर्चा
Khamgao नगरपालिकेच्या प्रस्तावित मालमत्ता करवाढीच्या मुद्द्यावर खामगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, हा प्रश्न आता प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अवाजवी करवाढीविरोधात शिवसेना (शिंदे गट) तसेच विविध सामाजिक संघटनांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत प्रशासनावर दबाव वाढवला.
या प्रकरणात प्रतापराव जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरणाला वेग आला. उपमुख्यमंत्री स्तरावरून स्थगितीबाबत निर्देश दिले गेले असतानाही, प्रत्यक्षात निर्णय मात्र अजूनही रखडलेला असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.
दरम्यान, मंत्रालयीन स्तरावरून जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. यानंतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व व्यापारी संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत ‘४ ते ८ पट करवाढ’ ही अन्यायकारक असल्याचा ठाम आरोप केला. जुन्या मालमत्तांवरही नव्या दराने कर लादल्याने सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांवर आर्थिक भार कोसळल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Farmers loan waiver : कर्जमाफी असूनही सावकारीचे सापळे घट्ट; शेतकरी अजूनही कर्जाच्या विळख्यात!
शेगाव आणि जळगाव नगरपालिकांप्रमाणेच खामगावलाही स्थगनादेश द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ‘दोन्ही बाजू ऐकूनच निर्णय’ घेण्याची भूमिका घेत नगरपालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरच शासनाकडे अंतिम अहवाल पाठवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रशासनाच्या या विलंबामुळे करवाढीचा निर्णय आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये असंतोष अधिक तीव्र होत आहे. आता शासन ठोस निर्णय घेते की हा मुद्दा अधिकच रेंगाळतो, याकडे संपूर्ण खामगावकरांचे लक्ष लागले आहे.








