सुशिक्षित बेरोजगार अभियंते आक्रमक; पाच तास मुख्य प्रवेशद्वार बंद, निविदा लिपिकाचा पदभार काढण्याची मागणी
Akola जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत कामांच्या वाटप प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप करीत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयातच डांबून आंदोलन करण्यात आले. तब्बल पाच तास मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आल्याने कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. आंदोलनाची तीव्रता वाढताच पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत दरवर्षी कामवाटप समितीची बैठक घेऊन सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि संस्थांना टोकन पद्धतीने निवडून कामांचे वाटप केले जाते. मात्र, प्रत्यक्षात मोजक्याच अभियंत्यांना कामे मिळत असून, या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. संबंधित कामांच्या नोटिसा देण्यासह निविदा लिपिकाचा पदभार काढून घेण्याची मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत!
निविदा लिपिकाचा पदभार काढण्याची मागणी
या मागण्यांसाठी सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या सदस्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. यावेळी कामांच्या वाटप प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. निविदा लिपिकाच्या भूमिकेवरही आंदोलकांनी आक्षेप घेत त्याचा पदभार काढण्याची मागणी केली.
सायंकाळी पाचच्या सुमारास महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक आकाश कवाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांना पाठिंबा दिला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरूजी, राजेश मिश्रा, ललित वानखडे तसेच उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनीही आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार; उपनिबंधकांचे आदेश धाब्यावर
कार्यकारी अभियंत्यांकडून दिशाभूल झाल्याचा आरोप
सोमवारी सकाळी या संदर्भात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी संबंधित अभियंत्यांना कामवाटप सभेबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, तब्बल पाच तास स्वतःच्या कर्मचाऱ्यांसोबतच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनाही बैठकीसाठी बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयात नेऊन कामवाटप समितीची सभा झालेली नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
या भूमिकेबाबत बांधकाम कंत्राटदार असोसिएशनचे सचिव गोपाल गावंडे यांनीही नाराजी व्यक्त केली. बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता किशोर ठेंग यांना यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
पाच तास कार्यालयाचे कामकाज ठप्प
समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलकांनी कार्यालयाबाहेर आंदोलन अधिक तीव्र केले. कार्यकारी अभियंता कार्यालयाबाहेर गेल्यानंतर आंदोलकांनी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून अधिकारी-कर्मचाऱ्यांना आतच कोंडून घेतले. त्यामुळे सुमारे पाच तास कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले.
दरम्यान, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांमध्ये सर्व तांत्रिक दृष्ट्या सक्षम उमेदवारांना समान संधी मिळावी, कामांचे वाटप पारदर्शक पद्धतीने व्हावे आणि बांधकाम विभागातील मनमानी कारभार थांबवावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.








