आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ‘घर चलो’ अभियान; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीची चर्चा
Amravati आपल्या आक्रमक कार्यशैलीमुळे आणि वेगळ्या राजकीय भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ‘प्रहार’ संघटनेची ताकद कायम ठेवतानाच आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीतही त्यांनी लक्ष घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी बच्चू कडू यांनी अप्रत्यक्षपणे पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावोगावी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘घर चलो’ अभियान राबवून नागरिकांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे.
वरकरणी हा उपक्रम सामाजिक आणि आरोग्यविषयक जनजागृतीचा भाग वाटत असला, तरी आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याकडे राजकीय मोर्चेबांधणी म्हणूनही पाहिले जात आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
डिलिमिटेशनवरून मविआत मतभेद; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचाही विरोध!
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर संपर्क वाढविणे, स्थानिक कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि संघटनात्मक जाळे मजबूत करणे, या दृष्टीने या उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची ही दुहेरी मोर्चेबांधणी विरोधकांसाठी आव्हान ठरणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे ‘प्रहार’ची स्वतंत्र ओळख आणि कार्यकर्त्यांची फळी, तर दुसरीकडे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, अशा दोन्ही आघाड्यांवर बच्चू कडू सक्रिय झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू यांच्या माध्यमातून कितपत वाढतो, हे आगामी निवडणुकांत स्पष्ट होईल. मात्र, सध्या त्यांच्या या राजकीय हालचालींनी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.








