gautam-singhania : उद्योग विश्वात खळबळ; गौतम सिंघानिया यांच्या स्पीडबोटीचा अपघात

gautam-singhania-speedboat-accident-maldives-airlifted-mumbai-hari-singh-missing : मालदीव येथून जखमी अवस्थेत केले मुंबईसाठी एअरलिफ्ट

Mumbai : देशातील आघाडीचे उद्योगपती आणि रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया मालदीवमध्ये झालेल्या भीषण स्पीडबोट अपघातात जखमी झाल्याने उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी पहाटे सुमारे १:१५ वाजण्याच्या सुमारास मालदीवमधील ‘व्ही फेलिधू’ बेटाजवळ हा अपघात घडला. अपघातानंतर त्यांना तातडीने बचाव पथकाने बाहेर काढून उपचारासाठी मुंबईत एअरलिफ्ट करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सात पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट समुद्रातील तीव्र लाटांमुळे अचानक उलटली. या बोटीत पाच भारतीय, एक ब्रिटीश आणि एक रशियन नागरिक होते. अपघातानंतर पाच जण समुद्रात फेकले गेले. या दुर्घटनेत सिंघानिया यांचे जवळचे मित्र आणि देशातील प्रसिद्ध रॅली ड्रायव्हर हरी सिंह बेपत्ता झाले असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

Mhada flats : म्हाडाच्या आलिशान फ्लॅटवर नेत्यांचा १४ वर्षांपासून ‘फ्री’ ताबा

गौतम सिंघानिया यांना या अपघातात किरकोळ दुखापत झाली असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या अपघातातील सर्वात गंभीर बाब म्हणजे हरी सिंह आणि आणखी एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. मालदीव कोस्ट गार्ड आणि स्थानिक प्रशासनाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली असून समुद्रात मोठ्या प्रमाणात शोधकार्य सुरू आहे.

Krushna Khode vs abhijit wanjari : कृष्णा खोपडेंचा अभिजित वंजारींविरुद्ध विधानसभेत हक्कभंग!

हरी सिंह हे देशातील अत्यंत यशस्वी रॅली ड्रायव्हर्सपैकी एक मानले जातात. १९९० च्या दशकात त्यांनी सलग पाच वेळा इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप जिंकत विक्रम प्रस्थापित केला होता. ‘फ्लाइंग सिख’ म्हणून ओळख असलेल्या हरी सिंह यांनी एशिया झोन रॅली चॅम्पियनशिप जिंकण्याचाही मान पटकावला होता. मोटरस्पोर्ट क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे क्रीडा आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातही चिंता व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे पर्यटन आणि जलवाहतूक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मालदीव प्रशासनावरही दबाव वाढण्याची शक्यता आहे.

__