Cockroach Janata Party to launch a campaign against exorbitant educational fees : प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अवाढव्य शैक्षणिक शुल्काविरोधात लढा उभारणार
Mumbai केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आपला मोर्चा आता खासगी शाळांच्या अनिर्बंध आणि अवाढव्य शुल्काकडे वळवला आहे. ए.बी.सी.डी. शिकवण्यासाठी एक ते दीड लाख रुपये इतकी भरमसाट फी आकारली जात असल्याचा गंभीर आरोप पक्षाचे नेते अभिजित दिपके यांनी केला आहे.
या खासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कावर तातडीने मर्यादा (कॅप) लावली पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी केली असून, याविरोधात आता आरपारची लढाई लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील शाळा संचालकांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतरवर सलग २० दिवस धरणे आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीमार झाल्यानंतर देशभरात तीव्र असंतोष उसळला आणि विरोधकही आक्रमक झाले.
Illegal construction : राष्ट्रीय महामार्गालगतच्या हॉटेल-ढाब्यांवर कारवाईचा बडगा!
अखेर या जनक्षोभासमोर केंद्र सरकारला नमावे लागले आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली, सर्व खासदारांना युवकांचे म्हणणे ऐकण्याच्या सूचना दिल्या, तर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही युवकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला होता.
सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा शैक्षणिक शुल्काच्या मुद्द्यावरून कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. या वाढत्या दबावामुळे आता केंद्र सरकारला खासगी शाळांच्या शुल्काबाबत स्पष्ट भूमिका घ्यावीच लागेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.








