Datta meghe : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

datta-meghe-passes-away-vidarbha-senior-leader-death-news-marathi : विदर्भाच्या राजकारण, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील एक युग संपले

Nagpur : राज्याच्या राजकारणातून दुःखद बातमी समोर आली असून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता मेघे यांचे वयाच्या 89 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसह असंख्य कार्यकर्ते आणि विद्यार्थीवर्ग शोकाकुल झाला आहे.

दत्ता मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला होता. अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून त्यांनी आपल्या कार्याने मोठं स्थान निर्माण केलं. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशा विविध पक्षांत काम करत जनतेशी सातत्याने नाळ जोडून ठेवली. त्यांनी नागपूर, रामटेक आणि वर्धा या तीन वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत चार वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला. विदर्भातील तीन भिन्न मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून येणारे ते एकमेव नेते म्हणून ओळखले जात होते.

Ashok kharat case : अशोक खरात प्रकरणावरून नवे वादळ; तृप्ती देसाईंवर ‘कोट्यवधींच्या डील’चे आरोप

राजकारणात त्यांनी मंत्री, विरोधी पक्षनेते तसेच राज्यसभा सदस्य आणि विधानपरिषद सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या सौम्य आणि मृदूभाषी स्वभावामुळे ते सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आदराचे स्थान राखून होते.

राजकारणासोबतच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. नागर युवक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची दारे खुली केली. तसेच ‘दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’सारख्या संस्थांची उभारणी करून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान देत ग्रामीण आणि आदिवासी भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. गडचिरोलीपासून मेळघाटपर्यंत त्यांनी मोफत वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून गरजूंची सेवा केली.

दत्ता मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळाली. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही राजकारणात सक्रिय असून त्यांचे सुपुत्र समीर मेघे हे हिंगणा मतदारसंघाचे आमदार आहेत.

त्यांच्या निधनानंतर राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांना आदर्श नेता, दातृत्वशील व्यक्तिमत्व आणि सर्वसमावेशक विचारसरणीचे प्रतीक म्हणून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नव्हे तर समाजासाठी कार्यरत असलेला एक आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Crime news : प्रेमविवाहाचा राग, तरुणाची नग्न करून गावभर धिंड, लोखंडी रॉडने बेदम मारहाण

दत्ता मेघे यांचे आयुष्य हे संघर्ष, सेवा आणि समर्पण यांचे प्रतीक होते. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था आणि त्यांनी घडवलेले कार्य आजही हजारो लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करत आहे. त्यांच्या कार्याची परंपरा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.