Congress and Vanchit protest in Nagpur, accusing Narendra Modi of stabbing the Constitution in the back : नागपुरात काँग्रेस-वंचितचा एल्गार, मोदींनी संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका
Nagpur ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ७५ व्या वर्षी निवृत्तीचे बौद्धिक दिले, त्याच संघाच्या ताब्यात आता नरेंद्र मोदी राहिले नाहीत. मोदी सैराट झाले असून त्यांनी संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकार आणि आरएसएसवर तोफ डागली. नागपूरच्या संविधान चौकात काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीच्या संयुक्त मोर्चाला संबोधित करताना त्यांनी ‘अबकी बार, ४०० पार’चा फुगा फुटल्याचा दावा केला.
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने एपस्टिन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव असल्याचा आरोप करून त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी संविधान चौक ते रेशीमबागेतील संघाच्या मुख्यालयात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यानंतर संविधान चौकात आंदोलन करण्यात आले.
Raj thackeray : अशोक खरातसारख्या विकृतांना राजकीय आश्रय कसा मिळतो?
आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडताना सपकाळ म्हणाले, सरसंघचालक मोहन भागवत यांना तिरंगा आणि संविधान भेट देण्यासाठी आम्ही निघालो होतो, मात्र ते सकाळच्या विमानाने दिल्लीला निघून गेले. यावर टीका करताना सपकाळ म्हणाले, सरसंघचालक तिरंग्याला आणि संविधानाला का घाबरतात? आम्ही भारतीय आहोत, आमच्याशी संवाद साधायला हवा होता. येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे आपली संस्कृती आहे. मात्र मोदी यांचा राजीनामा घेणे त्यांच्या हातात राहिले नसल्याने ते निघून गेले असावे. तुमचा प्रभाव आता भाजपवर उरलेला नाही, हेच यातून स्पष्ट होते अशी टीकाही यावेळी सपकाळ यांनी केली.
पंतप्रधान मोदी अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या एका फोनवर सरेंडर होतात. एपस्टीन फाईलमध्ये असे काय आहे की मोदींना अमेरिकेसमोर नतमस्तक व्हावे लागत आहे? ५६ इंचाची छाती आता कुठे गेली?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला. अमेरिकेसोबत झालेल्या करारामुळे आता भारतातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही, कारण सर्व धान्य अमेरिकेतून येणार आहे. हे सरकार केवळ अदानी-अंबानींसारख्या पुंजीवादी मित्रांसाठी चालवले जात आहे.
Akola Politics : अकोल्यात युतीत तणाव; शिंदे गटाकडून भाजपवर टीका
सपकाळ यांनी या मोर्चात स्पष्ट केले की, ही लढाई केवळ मोदी किंवा संघाविरुद्ध नसून ती लोकशाही आणि समता वाचवण्यासाठी आहे. निवडणूक आयोग, ईडी आणि सीआयडी खिशात घालून संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे. धर्माच्या आणि जातीच्या अफूच्या गोळ्या देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. पण आता मोदींचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले असून गाडीची चाके उलटी फिरू लागली आहेत. हे सरकार संविधानाऐवजी ‘बंच ऑफ थॉट्स’ लादण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.








