devendra-fadnavis-reply-to-uddhav-thackeray-breakup-second-marriage-remark : उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे खुमासदार प्रत्युत्तर
Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आपल्या खास खुमासदार शैलीत प्रत्युत्तर देत राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. “२०१९ मध्ये आमचा प्रेमभंग झाला. त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार थाटला, लग्नाचे वाढदिवसही झाले. आता पुन्हा मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नाही,” असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या काळातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी “ऑपरेशन टायगर नव्हे, हे ऑपरेशन देवेंद्र आहे” असा आरोप करत, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राजकीय घडामोडी घडवून आणल्या गेल्याचा दावा केला होता. यावर प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षाला आवश्यक ते सहकार्य केल्याचे स्पष्ट केले. मात्र, अशा राजकीय घडामोडींचे सर्व तपशील सार्वजनिकपणे सांगणे हे सूज्ञ राजकारणाचे लक्षण नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस म्हणाले की, राजकारणात प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता आपल्या भविष्यासाठी निर्णय घेत असतो. ज्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत ते आपले राजकीय भवितव्य सुरक्षित ठेवू शकत नाही, अशी भावना निर्माण झाली की अनेकजण नवीन पर्याय स्वीकारतात. यामागे वैयक्तिक भावना नसून राजकीय वास्तव महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षातील काळाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, अडीच वर्षे विरोधात असतानाही पक्षातील एकही आमदार फुटला नाही. कारण पक्ष नेतृत्वाने सातत्याने संघर्ष केला, सरकारला धारेवर धरले आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला. विरोधी पक्षात १५ वर्षे असतानाही दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कायम राहिला होता. कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवला नाही, तर पक्ष कमकुवत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Sudhir mungantiwar : सभागृहाचा अवमान सहन करणार नाही, सुधीर मुनगंटीवार यांनी सुनावले!
उद्धव ठाकरे यांच्या ‘ऑपरेशन देवेंद्र’ या आरोपावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मित्रपक्ष काही राजकीय निर्णय घेत असेल, तर त्यांना रोखण्याचे कोणतेही कारण नव्हते. ज्यांनी योग्य वेळी साथ सोडली, त्यांच्यासाठी मित्रपक्षाला थांबवण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वतःच्या राजकीय अस्तित्वाबाबत कोणतीही चिंता नसल्याचे स्पष्ट करत, राज्यातील बहुमताचे राजकारण आणि विद्यमान सत्ता समीकरणे सर्वांनाच माहीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
एकनाथ शिंदे यांच्याशी मतभेद असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला. आमच्यात नियमित संवाद असून अशा अफवा किंवा राजकीय कथा आमच्या नात्यावर कोणताही परिणाम करू शकत नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी मराठी पंतप्रधानांच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्याचाही फडणवीस यांनी उल्लेख केला. त्यांनी एका हिंदी गाण्याच्या ओळींचा संदर्भ देत, “हे प्रेम मला २०१९ मध्ये हवं होतं. तेव्हा प्रेमभंग झाला. आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार थाटला आणि पुढे निघालो,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला.
Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! चार दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज
यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे अनेक कार्यकर्ते आता बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे परत येत असल्याचा दावा केला. भविष्यातही राज्यातील राजकारणात विद्यमान महायुती अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून त्यांच्या ‘प्रेमभंग आणि दुसऱ्या लग्ना’च्या उपमेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.







