uddhav-thackeray-priyanka-chaturvedi-meeting-rajyasabha-row-shivsena-ubt-news-marathi : संजय राऊतांच्या विधानावरून वाद, खासदारांमध्ये नाराजीचे सूर
Mumbai : मुंबईत झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांच्या महत्त्वाच्या बैठकीत मोठा राजकीय वाद उफाळून आल्याची माहिती समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. बैठकीदरम्यान पक्षातील एकजूट आणि आगामी राजकीय लढतींच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असताना राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून वातावरण अचानक तापल्याचे समजते.
बैठकीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी खासदारांवर विश्वास व्यक्त करत पक्ष फुटण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार फुटण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी ही लढाई आपण सर्वांच्या बळावर लढत असल्याचे स्पष्ट केले. याचवेळी राज्यसभा जागेबाबत काँग्रेसकडून आलेल्या मागणीचा उल्लेख करत त्यांनी तो निर्णय टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी थेट चर्चा करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले.
Vikas Thakre : सरकारला फक्त मुंबईच दिसते का?; ५०० चौ. फुटांच्या करमाफीवरून सरकारवर हल्लाबोल
याचदरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी अचानक हस्तक्षेप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. “आय वाँट टू प्रोटेस्ट” असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांनी शरद पवार यांचे नाव घेत वक्तव्य का केले, असा थेट सवाल उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नामुळे बैठकीत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यावर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची बाजू घेत “ते बोलले म्हणून काय झाले, अंतिम निर्णय पक्षप्रमुख म्हणून मीच घेणार” असे स्पष्ट करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
बैठकीनंतर काही खासदारांनीही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. एका खासदाराने प्रियंका चतुर्वेदी यांना दीर्घकाळ संधी देऊनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे मत मांडल्याचे सांगितले जाते. तसेच पक्षातील संघटनात्मक कामकाजाबाबतही काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. विशेषतः आदित्य ठाकरे राज्यभर पुरेशा प्रमाणात दौरे करत नसल्याची तक्रार काही खासदारांनी बैठकीत मांडली.
या सर्व घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली असून राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील समन्वय आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे चित्र दिसत आहे.








