Bacchu Kadu to hold a one-day hunger strike over farmers’ issues : बच्चू कडूंचा नवा नारा, एक दिवसीय उपोषणाच्या पोस्टरची चर्चा
Amravati शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
“जय श्रीराम! कब मिलेगा हिंदू किसान को दाम?” या घोषवाक्यासह प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे. हे उपोषण शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे प्रतीकात्मक चित्रण करण्यात आले असून, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे छायाचित्रेही झळकत आहेत. त्यामुळे आंदोलनाबाबत उत्सुकता वाढली असून, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Andhare vs mhatre : “तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का?” सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल
या उपोषणाबाबत स्पष्ट करण्यात आले आहे की, हे आंदोलन केवळ सरकारविरोधी नसून राज्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. कर्जमाफीबाबत शासनाचे आभार व्यक्त करतानाच उर्वरित मागण्यांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनात साथ देणाऱ्यांचा या उपोषणादरम्यान सन्मान करण्यात येणार आहे. उपोषणात सहभागी झालेले, रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले, आर्थिक मदत केलेले किंवा विविध प्रकारे पाठिंबा देणारे शेतकरी, नागरिक व कार्यकर्त्यांचा गौरव केला जाणार आहे. त्यामुळे या आंदोलनाला मागण्यांसोबत कृतज्ञतेची जोड मिळणार आहे.
India lpg petrol diesel : देशात एलपीजी, पेट्रोल-डिझेल टंचाईची भीती निराधार!
दरम्यान, पूर्वी जाहीर करण्यात आलेली रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, कार्यक्रम केवळ एकदिवसीय उपोषणापुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या उपोषणाकडे केंद्रीत झाले आहे. एकंदरीत, बच्चू कडू यांच्या या आंदोलनाच्या घोषणेमुळे अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी प्रश्न ऐरणीवर आले असून, २७ मार्च रोजी होणाऱ्या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








