Allegation that fuel tax cuts are aimed at giving relief to marketing companies : काँग्रेस नेत्याचा सवाल, मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
Nagpur इराण युद्धामुळे मोठे इंधन संकट संपूर्ण जगावर ओढवले आहे. याच कारणामुळे बलाढ्य अमेरिकेलाही एक पाऊल मागे घ्यावे लागत आहे. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचा साठा कमी होत चालला असून, इंधन दरवाढीचे संकेत मिळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार, अशा चर्चा असताना केंद्र सरकारने इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात दहा रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा नागरिकांसाठी नव्हे, तर इंधनाचे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांसाठी देण्यात आला असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे सरकारने हा खेळ रचला असून, ही कपात म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती ६०-७० डॉलर प्रति बॅरल झाल्या होत्या. काँग्रेसच्या धोरणांमुळे इराण व रशियाकडून सर्वांत स्वस्त दरात कच्चे तेल भारताला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी असताना, त्यावेळी कर घटवण्यात आला नव्हता. स्वस्त इंधनाचा फायदा जनतेला मोदी सरकारने करून दिला नव्हता. याउलट, आपल्या उद्योगपती मित्रांसाठी नफेखोरी सुरूच ठेवली.
Bacchu Kadu : केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या घरावर धडकणार मोर्चा!
आता परिस्थिती उलट आहे. युद्धाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक पुरवठादार असलेल्या इराण या देशावर अमेरिकेने हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती भडकल्या आहेत. हे संकट जर आणखी काही दिवस सुरू राहिले, तर इंधन मिळणेही कठीण होईल. अशा वेळी इंधनाच्या दर कपातीचा प्रश्नच उद्भवत नाही; उलट इंधनाचे दर वाढतील अशी शक्यता आहे. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे मोदीजींच्या उद्योगपती मित्रांना तोटा होत आहे, म्हणूनच या मित्रांच्या कंपन्यांवरील करात कपात करण्यात आली असल्याचा आरोपही सोशल मीडियावरून विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.








