Nagpur student gets NEET exam centre in Abu Dhabi: पुनर्रचित ‘नीट’ परीक्षा २१ जूनला, तांत्रिक घोळावर चौफेर टीका
Nagpur नीट (NEET) पेपर फुटीच्या प्रकरणावरून देशभरात आधीच तीव्र असंतोष धुमसत असताना, आता राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) ढिसाळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. पुनर्रचित ‘नीट’ परीक्षा उद्या, २१ जून रोजी घातली असताना, नागपूरच्या एका स्थानिक विद्यार्थ्याला चक्क युएईमधील (UAE) ‘अबू धाबी’ येथील परीक्षा केंद्र देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नीट परीक्षा देणारा संबंधित विद्यार्थी नागपूरचा असून तो मुस्लिम समाजातील आहे. त्याला थेट देशाबाहेरचे केंद्र मिळाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
या तांत्रिक घोळावर चौफेर टीका झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने आपली चूक सुधारल्याचा दावा केला असून, संबंधित विद्यार्थ्याला आता नागपूरचेच केंद्र देण्यात आल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या निष्काळजीपणामुळे ही परीक्षा पुन्हा एकदा ‘नीटनेटकी’ पार पडेल का? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Eknath shinde : “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!” एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना थेट इशारा
यापूर्वी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर थेट ‘टेलेग्राम’ या सोशल मीडिया ॲपवरून फोडण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या पेपरफुटीच्या चौकशीत काही खाजगी शिकवणी चालक (Coaching Institutes) आणि थेट पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकांचाही सहभाग असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून काहींना अटकही केली आहे. तपासादरम्यान महाराष्ट्र, बिहारसह देशातील विविध राज्यांमध्ये पसरलेले पेपर फोडणाऱ्यांचे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे उघडकीस आले होते.
या महाघोटाळ्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड मानसिक तणावातून आणि नैराश्यातून देशभरात तब्बल पाच परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यासारखे टोकाचे पाऊल उचलले होते.या दुर्दैवी घटनांमुळे केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय कमालीच्या अडचणीत आले असून त्यांची मोठी नामुष्की झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तडकाफडकी पावले उचलत संबंधित काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती.
दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावरून देशभरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. काँक्रोच जनता पार्टीच्या वतीने या मागणीसाठी नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले होते, तर आज दिल्लीतील जंतर-मंतर येथेही केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली जात आहेत. या वाढत्या राजकीय आणि सामाजिक रोषाच्या दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने नव्याने घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत कुठलाही गोंधळ होणार नाही अशी ग्वाही देण्यात आली आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून टेलिग्रामवर बंदी घालण्यात आली असून, पेपर पुन्हा फुटणार नाही याची काटेकोर काळजी घेतली असल्याचा दावाही प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, एकीकडे सरकार आणि परीक्षा विभाग सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करत असतानाच, दुसरीकडे नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबू धाबीचे परीक्षा केंद्र देण्याच्या या नव्या गोंधळामुळे शिक्षण विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.








