vidhan-parishad-election-2026-maharashtra-political-mobilization-bjp-contest : भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढली
Mumbai : राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या रिक्त होणाऱ्या जागांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याआधीच विशेषतः भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा रंगू लागली आहे.
विधानसभेतील विद्यमान संख्याबळ लक्षात घेता भाजपचे किमान पाच उमेदवार निवडून येऊ शकतात, अशी स्थिती आहे. मात्र इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत चढाओढ वाढली आहे. अलीकडील राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या काही नेत्यांनी आता विधान परिषदेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीतसिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांची नावे चर्चेत असून इतरही काही नेते इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केनकर हे आमदार सध्या निवृत्त होत आहेत. यापैकी कोणाला पुन्हा संधी दिली जाते किंवा नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Trump warning iran : इराणने मार्ग खुला केला नाही तर अणुकेंद्रांवर हल्ल्यांची ट्रम्प यांची खुली धमकी!
विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक असतो. महायुतीचे एकत्रित संख्याबळ पाहता भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळून ८ उमेदवार निवडून आणण्याइतकी ताकद आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे संख्याबळ ४६ इतके असल्याने त्यांचा एकच उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनकर, संदीप जोशी, दादाराव केचे यांच्यासह उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी आणि राजेश राठोड हे सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या जागांवर नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या पुनर्निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येण्याची शक्यता असल्याने ती जागा ठाकरे यांच्यासाठी राखून ठेवली जाईल का, यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका यामध्ये निर्णायक ठरणार आहे.
Hanuman jayanti : हनुमान जयंतीनिमित्त माकडांची शिस्तबद्ध पंगत, भक्ती आणि भूतदयाचा संगम
विधीमंडळाच्या अलीकडील अधिवेशनात निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप देण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेली जुगलबंदी ही आगामी राजकीय संघर्षाची झलक मानली जात आहे. एप्रिलमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर या प्रक्रियेला अधिक वेग येण्याची शक्यता असून महायुतीतील जागावाटप आणि भाजपमधील अंतर्गत स्पर्धेमुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.








