akola-civil-line-police-station-asi-demand-case-woman-custody-judicial-custody : महिला आरोपीसोबत गैरवर्तन, अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार !
Akola : शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे संरक्षणाऐवजी तिच्याच सन्मानावर आघात करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटकेतील महिलेकडे राजेश जाधव यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर संबंधित महिलेच्या मुलीबाबतही अत्यंत आक्षेपार्ह आणि अमानवीय भाषेत प्रस्ताव दिल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली असून राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तत्काळ निलंबितही करण्यात आले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी अकोला जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात ओळख परेड करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली असून तहसीलदारांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. तपास यंत्रणा या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी करत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
Navneet Rana : ठाकरेंपुढे ‘हनुमान चालीसा’ पठणाशिवाय पर्याय नाही, नाहीतर शिल्लक सेनेवरही ‘गदा’!
या घटनेदरम्यान एक व्हिडिओही समोर आला असून त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले आहे.
तसेच, आरोपीला अटकेनंतरही काही सुविधा मिळाल्याचा आरोप पुढे आला आहे. कारागृहात पाठवण्यापूर्वी तो मोबाईलवर बोलताना दिसल्याने त्याला विशेष वागणूक दिली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाचा तपास अधिक पारदर्शकपणे होण्याची मागणी होत आहे.
___








