व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण कौशल्य विकासाचे बनावट प्रशिक्षण, तब्बल 400 कोटींचा घोटाळा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

कौशल्य विकासाचे बनावट प्रशिक्षण, तब्बल 400 कोटींचा घोटाळा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली लुबाडल्याची टीका

Nagpur कौशल्य विकास विभागाच्या अभियानांतर्गत नागपूरसह विदर्भात सुमारे ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली बनावट बिले सादर करून शासकीय निधी लाटण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी नागपूर येथे केली.

कौशल्य विकास अभियानांतर्गत १५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यापैकी ७५ टक्के उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि रोजगार न देताच बनावट बिलांच्या आधारे शासकीय निधी उचलण्यात आल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

मंत्री डॉ. अशोक उईकेंच्या ‘पुन्हा घटना घडल्यास चौकशी’च्या भूमिकेवरून मोठी टीका !

या घोटाळ्याबाबत बोलताना त्यांनी अमरावतीमधील कारवाईचा संदर्भ दिला. अमरावतीच्या उपायुक्तांनी अचानक तपासणी केली असता संबंधित ठिकाणी प्रशिक्षण सुरू नसल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणात अमरावती येथे गुन्हा दाखल झाला असून, अन्य सहा ठिकाणीही गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र, एवढे गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतरही अद्याप दोषींना अटक का होत नाही, असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

या प्रकरणासंदर्भात आपल्याकडे आवश्यक पुरावे असून, कौशल्य विकास विभागातील संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी केल्यास हा आकडा किमान एक हजार कोटी रुपयांवर जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. योजनेमागील सरकारचा उद्देश चांगला असला, तरी अंमलबजावणीच्या स्तरावर असा भ्रष्टाचार होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या पदरी पाच हजारांची मदत; सरकारच्या घोषणेवर शेतकरी नेत्यांची नाराजी

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक या चार प्रवर्गांतील कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक प्रवर्गातील १०० कार्यकर्त्यांच्या, म्हणजेच एकूण ४०० कार्यकर्त्यांच्या सहभागातून उपेक्षित समाजाला एकत्र आणणे, विविध प्रश्नांवर विचारमंथन करणे आणि पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीची दिशा निश्चित करणे हा या शिबिराचा मूळ उद्देश असल्याचेही वडेट्टीवार यांनी शेवटी स्पष्ट केले.

error: Content is protected !!