akash fundkar holds janta darbar at akola : भाजपकडून सोशल मीडिया पोस्टद्वारे उपक्रमाचा प्रचार
Khamgao अकोल्यात कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘जनता दरबार’ उपक्रमाची चर्चा आता खामगावातही जोर धरू लागली आहे. स्थानिक प्रश्नांच्या निवारणासाठी लोकप्रतिनिधींनी थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा घेतलेला हा पुढाकार सकारात्मक मानला जात असला, तरी त्यामागील राजकीय संदेशाचीही चर्चा रंगू लागली आहे.
अकोल्याचे पालकमंत्री म्हणून फुंडकर यांनी नागरिकांच्या तक्रारी, स्थानिक अडचणी आणि विकासकामांशी संबंधित प्रश्न थेट ऐकून प्रशासनाला तत्काळ सूचना दिल्याने या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात निर्माण होणारी दरी कमी करण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ प्रभावी ठरू शकते, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Makrand Patil : आबा, इकडेही लक्ष द्या हो! वर्ष उलटले, १४ गावांचा पाणीप्रश्न ‘जैसे थे’
मात्र, या उपक्रमानंतर खामगावात सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चेला स्पष्ट राजकीय रंग चढल्याचे दिसून येत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून ‘जनता दरबार’संदर्भातील रिल्स, पोस्ट आणि प्रचारात्मक संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात असून, त्यातून खामगावातही असा उपक्रम का होऊ नये, हा प्रश्न पुढे आणला जात आहे. आगामी स्थानिक राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या चर्चेकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
खामगाव मतदारसंघात नागरी सुविधांचे प्रश्न, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध समस्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांना थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर आपली बाजू मांडण्यासाठी अशा व्यासपीठाची अपेक्षा असणे स्वाभाविक मानले जात आहे.
राजकीय वर्तुळातही या चर्चेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अकोल्यातील यशस्वी प्रयोगानंतर खामगावातही ‘जनता दरबार’ आयोजित झाल्यास स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळू शकते, अशी चर्चा आहे. विशेषतः नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास या उपक्रमाचा राजकीय लाभ कोणाला होणार, याबाबतही तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.








