Nana Patole hits back at Uddhav Thackeray over the Baramati election : बारामती निवडणुकीवरून महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर
Nagpur बारामती विधानसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसवर झालेल्या टीकेमुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पारा चढला असून, त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला थेट इशारा दिला आहे. ‘माझ्यावर बोलण्याची वेळ आणू नका, अन्यथा वर्षभराचा संपूर्ण घटनाक्रम बाहेर काढीन,’ अशा शब्दांत पटोलेंनी आपला संताप व्यक्त केला.
पुण्यातील राजकीय घडामोडींवरून ‘सामना’ने काँग्रेसची भूमिका संकुचित असल्याचा ठपका ठेवला होता. यावर भाष्य करताना पटोले म्हणाले की, हे कोणी जाणीवपूर्वक करत असेल आणि वारंवार काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल, तर मी शांत बसणार नाही. काँग्रेस नेहमीच सहकाऱ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करते, पण जर आमच्या अंगावर कोणी येणार असेल तर परिणामांची पर्वा न करता मी सर्व सत्य समोर आणेन.
Sushma andhare : “दमानियांवर कारवाई करा, पण एकनाथ शिंदेंना चौकशीला कधी बोलावणार?”
पटोलेंनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जुन्या जखमांना पुन्हा उजाळा दिला. मविआचे सरकार असताना वर्षभर विधानसभा अध्यक्ष का होऊ दिला नाही? कोण कोणाच्या दबावात होते? कोणाच्या आदेशाने अध्यक्षपदाची नियुक्ती रोखण्यात आली होती? असे सवाल करत त्यांनी थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नेतृत्वावर निशाणा साधला. त्यावेळी पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या कोट्यातील हे पद रिक्त राहिले होते आणि त्याची नियुक्ती लांबल्याने पुढे सरकार कोसळण्यास तेच कारणीभूत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. आज पटोलेंनी या आरोपांचा समाचार घेत ‘पडद्यामागचे सूत्रधार’ वेगळेच असल्याचे संकेत दिले.
संजय राऊत यांच्याकडून होणाऱ्या टीकेचा संदर्भ देत पटोले म्हणाले की, सहकारी पक्षांना डिवचण्याची सवय लागली आहे. आज शेतकरी आणि अवकाळी पावसाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, म्हणून मी गप्प आहे. मात्र, जर मर्यादा ओलांडली गेली तर हायकमांडची परवानगी घेऊन मी या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश करेन. संकुचित भूमिका कोणाची आहे, हे जगाला सांगण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका, असा कडक इशारा त्यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दाखला देत बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करणाऱ्या पटोलेंनी केले होते. आता हायकमांडचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या विषयावर बोलणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.








