baramati-bypoll-2026-sharad-pawar-parth-pawar-congress-controversy-maharashtra-politics : पार्थ पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा ‘परिपक्वते’चा टोला
Baramati: बारामती पोटनिवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय तणाव उघडपणे समोर आला असून, पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे हा वाद अधिकच चिघळला आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभा केल्याने राष्ट्रवादीत नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, याच मुद्द्यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसवर थेट टीका करत महाराष्ट्रातील काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, असा इशारा दिला होता.
या वक्तव्याची दखल घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संयत पण सूचक प्रतिक्रिया दिली. पार्थ पवार यांच्या विधानाबाबत विचारले असता शरद पवार काही क्षण थांबले आणि बारीक हसत त्यांनी उत्तर दिले की, राजकारणात महत्त्वाच्या निर्णयांवर वक्तव्य करताना एक विशिष्ट परिपक्वता आवश्यक असते आणि ती कितपत आहे, हे सध्या सांगणे योग्य ठरणार नाही. त्यांच्या या प्रतिक्रियेला पार्थ पवार यांना दिलेला अप्रत्यक्ष इशारा म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करताना कोणाशीही चर्चा झालेली नसल्याचे सांगितले. काँग्रेसने आपले निर्णय स्वतः घ्यावेत, मात्र त्याचे परिणाम महाराष्ट्रात त्यांनाच भोगावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच लोकांच्या मनात अजित पवारांविषयी असलेले प्रेम लक्षात घेता एवढ्या मोठ्या आणि परिपक्व पक्षाने असा निर्णय घेणे चुकीचे असल्याची टीकाही त्यांनी केली. परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे सांगत आम्ही कुणालाही विनंती करणार नाही, जे नशिबात आहे ते पाहू, असेही त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडूनही पार्थ पवार यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना कुटुंबीयांच्या राजकीय वारशावर पुढे आलेल्या व्यक्तीने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणे अतिरेकी असल्याची टीका केली. तसेच त्यांच्या कुटुंबाशी संबंधित काही वादग्रस्त मुद्द्यांचा उल्लेख करत पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत भाष्य करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.
Sushma andhare : “दमानियांवर कारवाई करा, पण एकनाथ शिंदेंना चौकशीला कधी बोलावणार?”
एकूणच बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा उघडकीस आले असून, आगामी काळात या वादाचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








