व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Deulgao raja APMC : सभापती, उपसभापती आणि संचालकांचा राजीनामा, बाजार समितीत चाललय...

Deulgao raja APMC : सभापती, उपसभापती आणि संचालकांचा राजीनामा, बाजार समितीत चाललय काय?

Resignation of the Chairman, Vice-Chairman, and Directors : देऊळगाव राजा बाजार समितीत सत्तानाट्य; घोटाळ्यांच्या चर्चांनी तापले राजकारण

Deulgao raja येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी आता नाट्यमय वळण घेतले आहे. सभापती, उपसभापती आणि एका संचालकाच्या सलग राजीनाम्यांमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, समितीतील सत्तासमीकरण ढवळून निघाले आहे. या अचानक घडामोडींमुळे ‘राजीनामे स्वेच्छेने की दबावाखाली?’ असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी संबंधित सभापती समाधान शिंगणे यांनी प्रत्यक्षात गेल्या महिन्यातच जिल्हा निबंधकांकडे राजीनामा सादर केला आहे. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असतानाच वाढत्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, उपसभापती दादाराव खार्डे यांनीही नुकताच पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर एका अपक्ष संचालकानेही पद सोडल्याने समितीतील अंतर्गत मतभेद आणि नाराजी उघडपणे समोर आली आहे. या सलग राजीनाम्यांमुळे बाजार समितीतील सत्तेचे गणित नव्याने मांडले जात असून, आगामी काळात मोठे राजकीय फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dilip Sananda : सानंदा म्हणतात, आकाश फुंडकरांनी हे काम करावे!

या पार्श्वभूमीवर समितीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळ्यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः हमालांशी संबंधित प्रश्न, विविध योजनांमधील तफावत, तसेच काही उपक्रमांच्या आयोजनासाठी झालेल्या खर्चावर संशय व्यक्त केला जात आहे. काही कागदपत्रांतील विसंगतींच्याही चर्चा रंगत असून, या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.

Deulgao raja municipal council : स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत गाजले अतिक्रमण

विशेष म्हणजे, या सर्व घडामोडींमागे केवळ प्रशासकीय कारणे नसून तालुक्यातील गटबाजी आणि राजकीय दबाव महत्त्वाचा घटक असल्याचे बोलले जात आहे. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, तसेच आमदार मनोज कायंदे यांच्या समर्थक गटांतील अंतर्गत हालचालींमुळे परिस्थिती अधिकच तापली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजीनाम्यांना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, बाजार समितीतील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!