major changes in Amravati Congress expected; uncertainty looms over key posts : अमरावतीत मोठ्या बदलाचे संकेत; पदांवर अनिश्चिततेचे सावट
Amravati महाराष्ट्र काँग्रेसने पक्षाची तळागाळातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सुरू केलेल्या ‘संघटन सृजन अभियानामुळे अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खा. राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या अभियानामुळे दीर्घकाळ एकाच पदावर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांना पदत्याग करावा लागू शकतो.
या अभियानानुसार, सलग दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२६ पर्यंत पक्षाच्या भविष्यातील राजकीय तयारीसाठी ही पुनर्रचना महत्त्वाची मानली जात आहे.
अमरावती जिल्ह्यात या अभियानाची अंमलबजावणी वेगाने सुरू असून, जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या पदांवर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्हाभर काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या १० ते १२ वर्षांपासून ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे बबलू देशमुख यांच्या पदावरही गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षातील अनेक कार्यकर्ते त्यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.
Sunetra pawar : सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार
जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले की, “ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करणे, पदाधिकारी सक्रियपणे काम करतात का, याची पडताळणी करणे आणि विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणे, या उद्देशाने अभियान राबविले जात आहे. यासाठी पक्षाचे विशेष पथक नुकतेच जिल्ह्यात भेट देऊन गेले आहे.”
Iran america war : इराण-अमेरिका तणाव शिगेला; होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदीचा इशारा
माजी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी सांगितले की, “पक्ष बळकटीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी १४ एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, १६ एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर समितीमार्फत निवड होईल.” काँग्रेसची गेल्या काही वर्षांतील घसरलेली राजकीय ताकद लक्षात घेता, पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी हे अभियान मैलाचा दगड ठरणार असल्याचे काँग्रेस नेत्यांचे मत आहे. नव्या नेतृत्वाला संधी देऊन पक्षाचे गतवैभव परत मिळविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.








